You are currently viewing आग लावणारे नकोत तर आग विझवणारे सच्चे माणूस बना

आग लावणारे नकोत तर आग विझवणारे सच्चे माणूस बना

सिनेदिग्दर्शक डॉ. नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन

जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाचे शानदार उद्घाटन

सावंतवाडी

छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे दैवत असून दोघांनीही मानवतेचा संदेश दिला आहे. आज आपण माणूस म्हणून जगू शकतो, याचे सारे श्रेय छत्रपती शिवराय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. या महान नेत्यांच्या आदर्शांवर स्वतःला सिद्ध करा. समाजात सध्या आग लावणाऱ्या अनेक विकृती फोफावत असताना आपण मात्र आग लावणारे नाही तर आग विझविणारे बना, असे परखड व वास्तवदर्शी मत डॉ.नागराज मंजुळे यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.
दरम्यान, सावंतवाडी ही अत्यंत थोर महान लोकांची भूमी आहे. या भूमीतून अनेक नररत्ने जन्माला आली आहेत. त्यामुळे सावंतवाडीत येणे हे मी भाग्य समजतो असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर जनवादी साहित्य संस्कृती – संमेलनाचे उद्घाटक म्हणून कवी तथा सिनेदिग्दर्शक डॉ.नागराज मंजुळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार, स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष किशोर जाधव, दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती महाराष्ट्राचे निमंत्रक सुबोध मोरे, गोव्याचे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत जाधव, संयोजन संमेलनाच्या कार्याध्यक्षा प्रा.प्रतिभा चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी अभिनव पद्धतीने नागराज मंजुळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
उद्घाटनप्रसंगी अत्यंत मोजक्या शब्दात सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, काही माणसांचा चेहरा नाही त्यांचे साहित्य बोलते, तेच आपण विचारात घेतले पाहिजे. हे मी स्वतः अनुभवले आहे. आज आपण आनंदी जगतो आहोत, पण या आनंदामागे अनेकांचे बलिदान आहे. माणसाचं जगणं नीट करण्यासाठी अनेक पिढ्यांनी आपले अस्तित्व बहाल केलेले आहे. जनवादी साहित्य संमेलन म्हणजे विचारांचे साहित्य संमेलन आहे. म्हणून साहित्य संमेलनातून चांगल्या विचारांची पेरणी होईल, अशी मला अपेक्षा आहे. व्यक्ती व्यक्ती व्यक्तींमध्ये संवाद व्हायलाच हवा, माणूस दूर गेला की तो राक्षस बनतो, म्हणून अशा संमेलनांची समाजात नितांत गरज असल्याचे परखड मत सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
संमेलनाध्यक्षा व जेष्ठ पत्रकार संध्या नरे-पवार यांनीही यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. संध्या पवार म्हणाल्या की, जनवादी संमेलन हे साहित्य आणि संस्कृती संमेलन आहे. ही बाब मला लक्षणीय वाटते. जिथे जनांनी लेखणी हातात घ्यायची का नाही हे प्रस्थापितांची संस्कृती ठरवते, जनांनी लिहिलेल्या साहित्यकृतीला मान्यता द्यायची का नाही हे अभिजनांची समीक्षा ठरवते. तिथे या वैचारिक प्रभुत्वाला सामोरे जाताना जनांना आपल्या संस्कृतीतच उभे राहावे लागते. म्हणून खऱ्या अर्थाने जनवादी साहित्य संमेलन हे आपल्या तळागाळातील कार्य करणाऱ्या दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, कष्टकरी, बहुजनांच्या मुक्तिदायी राजकारणाच्या बाजूने सांस्कृतिक हस्तक्षेप करणारे हे संमेलन ठरणार आहे, असे सांगत लेखिका संध्या नरे-पवार यांनी प्रस्थापित राजकीय व सांस्कृतिक साहित्य क्षेत्रावर प्रहार केला.
संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष संपत देसाई यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले, साहित्य संमेलन हे सत्याच्या आग्रह धरण्याचे संमेलन असून माणूस म्हणून जगू द्या या हाकेच्या संघर्षांचे संमेलन आहे. तसेच सर्व भारतीयांना माणूस म्हणून एका माळेत आणण्यासाठी हे संमेलन आहे. विद्रोहाची ठिणगी, सत्याची कास, खऱ्या साहित्याचा शोध घेण्यासाठी मंथन करणारे हे जनवादी संमेलन आहे, असे स्पष्ट केले. तर स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर म्हणाले की, आद्यशिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलननगरीत जनवादी साहित्य संस्कृतीचे संमेलन साजरा होत आहे, याचा विलक्षण आनंद होतोय. सावंतवाडीच्या इतिहासाची परंपरा तेजोमय ठेवण्याच्या दृष्टीने जनवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आमच्या सावंतवाडी शहराची साहित्य परंपरा ही प्रचंड महान आहे. कोकणात अनेक साहित्यिक व लेखकांनी आपला ठसा उमटविलाआहे. कादंबरीकार वि.स.खांडेकर, कवी मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, प्रा. वसंत सावंत, मधु मंगेश कर्णिक, मामा वरेरकर, गंगाराम गव्हाणकर, प्रा.प्रवीण बांदेकर, अजय कांडर अशा कितीतरी लेखकांनी आपल्या साहित्याचा आनंद साहित्यप्रेमीना दिलाय, असेही स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी सांगितले.
यावेळी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रा.डॉ.नवनाथ शिंदे (आजरा ), कथालेखक सिद्धार्थ देवळेकर (लांजा), ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते दुर्गादास गावडे (गोवा) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उद्घाटनसत्राचे सूत्रसंचालन सुरेश दास व योगेश सकपाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजन समितीचे उपाध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सचिव अंकुश कदम, उपाध्यक्ष मिलिंद माटे, सहसचिव प्रा.रुपेश पाटील खजिनदार संतोष पाटणकर प्रसिद्धी विभाग प्रमुख मोहन जाधव, रणजित कालेकर, युवराज जाधव, अमोल कांबळे, परमेश्वर सावळे, प्रज्ञा मातोंडकर, दीपक कदम, सिद्धार्थ तांबे, स्वाती तेली, महेश पेडणेकर, उषाकिरण सम्राट, दीपक पटेकर, डॉ.उल्हास चांदेलकर, सत्यवान पेडणेकर, प्रा. नीलम कांबळे, विठ्ठल कदम, सरिता पवार, नीलिमा जाधव, सुभाष गोवेकर, नरेंद्र पाटील, अर्जुन जाधव यांसह संयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा