पोलीस उपनिरीक्षक डॉ. मिलिंद माणिक कुंभार यांना सेवेत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे पदक प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र पोलीस विभागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी पार पाडलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना 2021 या वर्षीच्या पोलीस महासंचालक पदकांची घोषणा महाराष्ट्रदिनी एक मे रोजी करण्यात आली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ठ कामगिरीसाठी मूळचे सांगली जिल्ह्याचे रहिवासी पोलीस उपनिरीक्षक डॉ. मिलिंद माणिक कुंभार यांचा समावेश आहे.
पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात आपल्या सेवा कालावधीत पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
त्यांच्या पत्नी डॉ. दीप्ती कुंभार यांनीही त्यांना खडतर प्रवासात मोलाची मदत केली. डॉ. दिप्ती या मूळच्या इचलकरजी येथील महासत्ताचे फायनान्स मॅनेजर शंकर बडक्यागोळ यांच्या कन्या आहेत.डॉ दिप्ती यांनी गेल्या चार वर्षांपासून आपल्या पोलीस अधिकारी पतीच्या खांद्याला खांदा लावून गडचिरोलीतील आदिवासी बांधवांना मोफत औषधोपाचार देऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कुंभार यांनी नक्षल्यांशी दोन हात करत यशस्वी व उल्लेखनीय कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्यातील उप पोलीस स्टेशन व्यंकटापुर येथे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले आहे. दोघांनीही जयश्री कुंभार, माणिक कुंभार, वर्षा बडक्यागोळ व शंकर बडक्यागोळ यांचे प्रोत्साहन लाभले.