कणकवली
दोन- अडीच वर्षाच्या करोना नियमांच्या मुक्तीनंतर, चालू वर्षी फोंडाघाट- झरयेवाडी येथील श्रीदेव केळोबा (राई ) येथील वार्षिकोत्सव उदंड उत्साहात आणि भाविकांच्या अपूर्व गर्दीत पार पडला. श्री देव केळोबा हे फोंडाघाटवासियांचे श्रद्धास्थान ! मनापासून मागितलेली सर्व काही हे स्थान पूर्ण करते , अशी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा असल्याने, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गर्द राई, मोठाले वृक्ष आणि निसर्ग अनुभूतीचे वास्तव्य यामुळे केळोबावर माहेरवाशीणींची अपार भक्ती !
यादरम्यान देवगड- कणकवली चे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी श्री देव केळोबा चे दर्शन घेतले. त्यांनी यावेळी झरयेवाडी वरील ग्रामस्थांशी संवाद साधला आणि येथील विकासकामात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन देऊन, वार्षिकोत्सवास शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत सरपंच आग्रे, राजन चिके, विश्वनाथ जाधव, भालचंद्र राणे इत्यादी उपस्थित होते.
दरवर्षी या निमित्ताने विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चाकरमानी भावीक, आबालवृद्ध स्त्री-पुरूष, युवा-युवती या वार्षिक उत्सवामध्ये तन-मन-धनाने सहभागी होतात.सकाळी श्री केळोबाच्या पूजाअर्चा नंतर, दुपारी “सत्यनारायण महापूजा” पार पडली. सायंकाळी तमाम महिला सुवासिंनींचे हळदीकुंकू मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमा दरम्यान सढळ हस्ते देणगी देणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संध्याकाळी ढोल-ताशांच्या गजरात आणि श्रीदेव केळोबा च्या जयघोषात राई मंदिराला अबाल-वृद्धांच्या उपस्थितीत पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. रात्री चिंदर येथील श्री आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक वारकरी दिंडी भजनाचा उपस्थितांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी या वार्षिक उत्सवासाठी बहुसंख्येने चाकरमानी सहकुटुंब आले होते. दुसरे दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.पूर्वतयारी, नियोजन, आरास आणि सुविधांसाठी श्री देव केळोबा मंडळ फोंडा- झरेवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.