You are currently viewing जिवंतपणी मयत दाखवून सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनकडून सदस्यत्व रद्द…

जिवंतपणी मयत दाखवून सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनकडून सदस्यत्व रद्द…

वसंत केसरकरांचा आरोप; गुन्हा दाखल करून कार्यकारिणी बरखास्तीची मागणी…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या अध्यक्ष,कार्यवाहकांनी आपल्याला जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांकडे जमा केली. हा प्रकार माहीती अधिकारात उघड झाला,असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत फेडरेशनचे संस्थापक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केला. दरम्यान या प्रकाराचा ठपका ठेवून ही कार्यकारिणी तात्काळ बरखास्त करण्यात यावी,तसेच जबाबदार असणाऱ्या कार्यकारणी सदस्यांसह धर्मादाय आयुक्ततांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी आपण राज्य फेडरेशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी प्रसाद अरविंदेकर, नंदन वेंगुर्लेकर,जितेंद्र म्हापसेकर, आर.डी.बांदेकर,विकी केरकर,एस.ए.लाखे, हनुमंत कारीवडेकर,नरेंद्र मुळीक आदी उपस्थित होते.

श्री केसरकर पुढे म्हणाले सावंतवाडी जिमखाना येथे १९८३ साली सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले होते.मात्र आता कबड्डीचा प्रसार योग्य पध्दतीने होताना दिसत नाही.फेडरेशनच्या अध्यक्ष व कार्यवाहकांनी मला जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तकांडे जमा करून माझे नाव सदस्य यादी मधून कमी केले. आणि या कार्यकारणीला धर्मादाय आयुक्तांनी मंजूरी देऊन सिंधुदुर्ग न्यायालयाची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच पोलिसांनी याची चौकशी करावी,आणि न्याय मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
श्री केसरकर पुढे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक कबड्डी खेळाडूंवर अन्याय झालेला आहे.त्यामुळे अन्याय झालेल्या खेळाडूंनी आम्हाला संपर्क करावा, आणि हा बेजबाबदार कारभार थांबवावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रकरणाची चौकशी करताना कोणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तर तो खपवून घेणार नाही, आणि जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही,तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा