You are currently viewing सावंतवाडी पत्रकार संघ ठरला आदर्श पत्रकार संघ पुरस्काराचा मानकरी

सावंतवाडी पत्रकार संघ ठरला आदर्श पत्रकार संघ पुरस्काराचा मानकरी

सावंतवाडी

मराठी पत्रकार परिषदेचा आठवा तालुका पत्रकार संघ व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा गंगाखेड येथील संत जनाबाईनगरी येथे संपन्न झाला. यावेळी आजची पत्रकारिता ही सत्तेला सवाल करणारा वंचितांचा आवाज आणि जनतेचा भोंगा असणारी असायला हवी. ग्रामीण पत्रकार हा मूळ पत्रकारितेचा कणा असून तो सक्षम व्हायला हवा.यासाठी त्याला संरक्षण आणि आर्थिकस्तर मिळायला हवा. आजही ग्रामीण भागातील काही पत्रकार संघ यासाठी झटत असून अशा पत्रकार संघाचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वृत्तनिवेदक तथा पत्रकार विलास बडे यांनी केले.

यावेळी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला स्व. वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विजय जोशी अनील महाजन पिराजी कांबळे उत्तम पवन गंगाखेड शिक्षण संस्थेचे प्रमुख संतोष गोंडे गणेश रोकडे विष्णू मुरकुटे अनिल महाजन, मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते.

तर सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र पवार, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सचिव प्रसन्ना राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सदस्य दीपक गावकर, नरेंद्र देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यातील एकूण आठ तालुका पत्रकार संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम देशमुख म्हणाले, आता पत्रकारांच्या विविध प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. शंकरराव चव्हाण आरोग्य योजनेसाठी अर्थसंकल्पात ५० कोटींची गरज आहे. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नाबाबत कोणी बोलत नाही. सामान्य पत्रकारांसोबत समाजही असत नाही. पत्रकार हल्ल्याच्या निषेधासाठी कधी गाव बंद झाले असे होताना दिसत नाही. म्हणूनच पत्रकारांनी संघटित व्हायला हवे. छोटी छोटी वर्तमानपत्र जगली पाहिजेत. यामुळेच १७ मे ला पत्रकारांच्या सगळ्या मागण्यांसाठी राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा