वेंगुर्ला
सिधुदुर्ग दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य अनुश्री कांबळी व नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी भेट घेतली. यावेळी तालुक्यातील आरोग्याच्या अन्य सोयीसुविधांबरोबरच तीन ठिकाणी स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी, या मागणीचे निवेदन आरोग्यमंत्र्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर, अल्ट्रासाऊंड मशिन, ऑक्सिजन, एक्सरे मशिन, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय तसेच आडेली व परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतंत्र रुग्णवाहिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि अंतर्गत येणारी वर्ग रिक्त पदे, डॉक्टर, नर्स, तांत्रिक व अतांत्रिकपदे, कार्यालयीन पदे भरणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रिक्त पदांसंदर्भात मुंबईमध्ये आमदार वैभव नाईक व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करणार असून रुग्णवाहिका व सुसज्ज मशिनरींबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.