नितेश राणेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना ; सर्वसामान्य नागरिकांना त्रास नको…
कणकवली
शहरातील सर्व्हीस रोड हे दुकाने आणि पार्किंगने व्यापले आहेत. उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूंनी पार्किंग होत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे सर्व्हीस रस्त्यावरील ही या अतिक्रमणांवर कारवाई करा असे निर्देश आमदार नीतेश राणे यांनी आज पोलीस प्रशासनाला दिले.
आमदार नीतेश राणे आज कणकवली शहरात आले असताना पटवर्धन चौक ते बसस्थानक या दरम्यान सर्व्हीस रोडवर दुकाने आणि पार्किंग होत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी गाडीतून खाली उतरून तेथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांना अनधिकृतपणे वाहने पार्किंग करणार्यांवर कडक कारवाई करा अशा सूचना दिल्या. तसेच कोणीही व कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असू दे कारवाईसाठी मागेपुढे पाहू नका अशा सूचना देखील श्री राणे यांनी दिल्या. सर्वीस रस्त्यावर अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या दुचाकी पार्किंग किंवा चार चाकी, कार पार्किंग मुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक दुकाने देखील सर्विस रस्त्यावर थाटली आहेत. या संपूर्ण अनधिकृत पार्किंग व रस्त्यावर थाटलेल्या दुकानांवरही कारवाई च्या सूचना श्री राणे यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजू हिर्लेकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.