कोरोनाच्या विषाणूच्या संकटाने अनेक संदर्भ बदलले तसे अभ्यासाचीही ऑनलाईन अभ्यास करण्याची पद्धती या कोरोना काळात पुढे आली. परंतु ग्रामीण भा गात ज्याठिकाणी मोबाईलवरच संभाषण होणे अवघड त्या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर तर अशक्यच. नेटवर्क समस्या ग्रामीण भा गात सगळीकडे सारखीच. या नेटवर्क समस्येवर मात करत दारिस्ते गावातील स्वप्नाली गोपिनाथ सुतार ही युवती मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी पदाचे शिक्षण घेण्यासाठी ऑनलाईन लेक्चरसाठी डोंगरावर ज्याठिकाणी नेटवर्क मिळते त्या दारिस्ते गावातील डोंगरावर जावून अभ्यास सुरु केला. भरपावसात फक्त झोपडीच्या आडोशात ती दिवसभर लेक्चर अटेंड करत आहे. प्राणीप्रेमी असलेली स्वप्नाली आपले पशुवैद्यकिय अधिकारी होण्याचे स्वप्न हा नेटवर्कशी संघर्ष करत पूर्ण करू पहातेय.
दारिस्ते तालुका कणकवली येथील स्वप्नाली सुतार या पशुवैद्यकीय अधिकारी पदाचे शिक्षण घेणा-या तरुणीने मला याच क्षेत्रात काम करायची आवड असल्याने बीएसस्सी नर्सींग चे अॅडमिशन कॅन्सल करुन मी माझ्या आवडीच्या विभागाचा अभ्यास करते आहे. या संबंधीचे मनोगत तीच्याच शब्दात…. सध्या चालू असलेल्या कोविड-१९ या जागतिक महामारीचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झालेला आढळून येतो. शैक्षणिक क्षेत्रावर देखील या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम झालेत. शाळा-कॉलेजेस बंद आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो, आता मुलांना शिकवणार कोण ? याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन एज्युकेशन सीस्टीम चा उपयोग होऊ लागला. परंतु या सिस्टिमचा फायदा ग्रामीण भा गातील मुलांना मिळताना थोडं कठीणच ! कारण जिथे कॉल करण्यासाठी नेटवर्क मिळत नाही तिथे ऑनलाइन क्ल्लासेस ची गोष्ट दुरच. माझ्याही बाबतीत असच काहीसं घडलं. सुरूवातीला कॉलेजेसना १५ दिवसांची सुट्टी जाहीर केलेली. त्यातही आठ-दहा दिवस शिल्लक असताना मी गावी आले. थोड्याच दिवसांसाठी राहायचं असल्याने मी पुस्तकं आणली नाहीत इथे आल्यावर मात्र लॉकडाऊन झालं आणि परिस्थिती जास्तच गंभिर होत गेली. मग मी मोबाईलमधील स्टडी मटेरिअल चा वापर करून अभ्यासाला सुरूवात केली. थोड्याच दिवसांत आमचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले. आमच्या घरी रेंज नसल्याने मी तिथून क्लासेस अटेन्ड करू शकत नव्हते म्हणून मी आमच्याकडील एका डोंगरावर येऊन रेंज मिळते का बघीतलं डोंगरावर रेंज मिळत असल्याने मी इथेच अभ्यासाला येऊ लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वरती डोंगरावर दुपारपर्यंत राहणं थोड कठीणच! पण मी १.३० वाजेपर्यंत डोंगरावर अभ्यास करायचे. आणि पुन्हा दुपारी ३ वाजता डोंगरावर अभ्यासाला जायचे. ७ वाजेपर्यंत अभ्यास करून घरी यायचे. म्हणजे सकाळी ६.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पर्यंत झोपडीत असते.