जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख
साधारण चवथी पाचवीत असेन मी तेव्हा… काही काही गोष्टी
या विस्मरणात जातच नाहीत.आता ही मला मी त्या जागी पाहू
शकते इतके स्पष्ट ते दृश्य मला डोळ्यांसमोर दिसते.
मी तेव्हा आमच्या शिवण शिकवणाऱ्या बाईंकडे जात असे.
वर्गातल्या इतरही मुली असतच बरोबर. बाई आम्हाला हेम ,
टीप कशी घालायची ते शिकवत असत. आम्ही कापडाच्या
तुकड्यावर सुई दोरा घेऊन सराव करीत असू .
तेव्हा तिथे समोरच्या घरात रेडिओ होता. मोठे हौशी लोक असावेत बिचारे ! हो , अहो मी साठ पासष्ट वर्षांपूर्वीची घटना
सांगते आहे. त्या रेडिओवर लताने गाईलेले”राधा ना बोले ना बोले ना बोले रे” हे गाणे चालू असे व समोरच्या घराच्या ओट्यावर आम्ही शिवणकाम शिकत असू.
लाताच्या सुमधुर आवाजातले ते गाणे लागले रे लागले की,
माझे जीवाचे कान होत नि अवघी आठ नऊ वर्षांची मी जीवाचे
कान करून ते गाणे ऐकत असे . काही ही फारसे न कळण्याचे
माझे वय होते, पण माहित नाही त्या गाण्यात जो तबला वाजतो तो तुम्ही आज ही ऐकून पहा… अहो, काय बोलतो तो
तबला ? वा आता ही त्याचा तो ठेका माझ्या डोक्यात घुमू
लागला आहे . गाणे तर अप्रतिम आहेच पण त्या तबल्याच्या
दमदार ठेक्याने ते अधिकच मनात शिरते व माणूस कान देऊन
नुसता तबला ऐकू लागतो. वाह वा .. काय ठेका आहे त्याचा?
लाजवाब.. केवळ लाजवाब.. खेड्यातली नुलगी, गाण्यातला
गा ही न कळणारी, पण काय असेल ते असो, मला गाण्याचा
कान आहे, उत्तम क्लासिकल गाणी मला फार आवडतात.!
ते गाणे इतकी वर्षे गेली तरी मी जरा ही विसरले नाहीच पण
टेपरेकॅार्डरच्या नव्या जमान्यात मी ते पुन्हा जीवाचे कान करून
ऐकले कारण मधली ३०… ४० वर्ष ते मला माझ्या मनाच्या कप्प्यात असले तरी ऐकायला मिळाले नव्हते. मला अत्यंत
प्रिय असलेले हे गाणे जणू माझी “मर्मबंधातली” ठेव बनली
होती नि मला ती कितीतरी वर्षे दुर्मिळ झाली होती. हो.. पूर्वी
अशी उठसूठ गाणी उपलब्ध नव्हती. रेडिओवर आवडीची गाणी
लोक जीवाचा कान करून ऐकत असत म्हणूनच अमिन सयानीची रेडिओ सिलोनवरची बिनाका गीतमाला एवढी फेमस
झाली होती. मला आठवते ११ वाजता कामगार सभा सुरू झाली की घरोघरच्या रेडिओचे आवाज फुल्ल होत असत व
सगळी गल्ली मोठ्या आवाजात कामगार सभेतील गाणी ऐकत
असे.. अतिशय आनंदाचे ते घरोघरचे क्षण होते नि सर्वांचे या
बाबतीत एकमत होते हे ही तितकेच खरे आहे. तिच गोष्ट
बिनाका मालेबाबत म्हणता येईल . हिंदी गाण्यांना नाव लौकिक मिळवून देण्यात अमिन सयानिंचा मोठा वाटा आहे हे
कोणी ही नाकारू शकत नाही .
बघा, अशी एखादी आज तुम्हाला किरकोळ वाटणारी गोष्ट
सुद्धा कुणाच्या मर्मबंधातली ठेव असू शकते या वर कुणाचा
विश्वास बसणार नाही. तिच गोष्ट माझ्या आईची!
ती काही फार शिकलेली नव्हती तरी…
माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी आमच्या घरी ग्रामोफोन
आणला होता. माझे वडिल फार हौशी होते. जगातले जे जे
नवे व चांगले ते आपल्याकडे हवे असे त्यांना वाटायचे. मग हा
ग्रामोफोन त्यांनी आणला. पूर्वी काळी गोल तबकडी मिळायची
गाण्यांची . तुम्ही पाहिली असेल , हिज मास्टर्स व्हाईस ऐकणारा तो ग्रामोफोनच्या तबकडी समोर मन लावून गाणे
ऐकणारा तो कुत्रा! मान तिरपी करून तो गाणे ऐकतो असे ते
चित्र तबकडीवर असे. तर तो ग्रामोफोन , एका हॅण्डल ने गोल गोल फिरवून त्यात आम्ही हवा भरायचो नि मग त्या गोल
फिरणाऱ्या तबकडीवर ती काळी गाण्याची तबकडी ठेवायची
व ती फिरत असतांनाच सुई असलेले हॅण्डल त्या वर टेकले की
लगेच गाणे वाजायला सुरूवात व्हायची.
राजकपूर नर्गिस चे सिनेमे तेव्हा जोरात होते.राजा की आएगी
बरात पासून ओ बसंती पवन पागल पर्यंत सगळी गाणी ऐकायला आमची अख्खी गल्ली आमच्या अंगणात येऊन बसे.
नि मी मोठ्या तोऱ्यात गाणे लावत असे. एक बांगडी संपली की
ती काढून दुसरी ठेवायची व वाजवायची असा तो कार्यक्रम असे.तर काय सांगत होते मी… हं , आई पण ती गाणी ऐकायची पण त्यातले एक गाणे तिला विशेष आवडायचे..
ते म्हणजे” मारी कटारी मर जाना “ हे गाणे ऐकले की ती
विशेष खुष व्हायची! नऊवारी छान साडी, कपाळावर कुंकवाची आडवी चिरी लावलेली माझी आई गालातल्या
गालात अशी खुदकन् हसायची की तिच्या डोक्यावरच्या
पदरा आडून ही तिचे ते हसू मी इतकी लहान असूनही माझ्या
नजरेतून सुटत नसे. आई गेली तरी ते दृश्य माझ्या नजरे समोरून कधी ही पुसले गेले नाही . . इतके की अलिकडे सहज उपलब्धीच्या जमान्यात माझ्या मिस्टरांना बऱ्याच
वर्षांपूर्वी ते शोधायला लावून पुन्हा मी ते जीवाचे कान करून
ऐकले. पुन्हा आई नसली तरी तिचा हसरा पदराआडचा चेहरा
मला दिसला नि मी पुन्हा खुश झाले .
काय मंडळी … कुणा कुणाच्या जीवनात अशा ही मर्मबंधाच्या
ठेवी असू शकतात … विश्वास बसत नाही ना ?
पण कुणाच्या असोत नसोत… माझ्या मात्र या मर्मबंघातल्या
ठेवी आहेत . अजून ही बऱ्याच काही आहेत पण सगळ्या इथे
सांगणं कसं शक्य आहे .. म्हणून थांबते …
हसू नका बरं मला … नाही तर मला वाईट वाटेल …
धन्यावाद मंडळी …
तुमचीच…
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ४ मे २०२२
वेळ रात्री . ११ : ४३