भाजपा तर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर; तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी
इन्सुलीतून गोव्याकडे होणारी ओव्हरलोड खडी वाहतूक तत्काळ बंद करावी तसेच मायनिंगला घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी व मळेवाड येथे बेकायदेशीररित्या साठा करून ठेवलेले मायनिंग जप्त करावे अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना सादर केले.
यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आंबोली मंडल अध्यक्ष बाळा पालेकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या बाबत माहिती दिली. इन्सुली येथे पर्यावरण विषयक नियमांची पायमल्ली करून अनेक व्यावसायिक क्वारीत उत्खनन करून परवानगीहून अधिक दगड काढत आहेत. तसेच वाहतूक करताना ओव्हरलोड वाहतूक करत आहेत. क्वारीतील अनिर्बंध उत्खननामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे. परवानगीहून अधिक उत्खनन होत असल्याने आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे शासनाचे घालून दिलेले निर्बंध पायदळी तुडवले जात आहेत. तसेच योग्य रॉयल्टी भरली जात नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष देवून कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच कळणे येथून मायनिंग घेवून जाणारे डंपर भरधाव वेगाने धावत आहेत. वाटेत सुरक्षारक्षक नसल्याने दोन डंपरमध्ये १०० मीटर अंतर ठेवले जात नाहीत. चालक बेजबाबदारपणे ओव्हरटेक करण्याची जणू स्पर्धाच लावतात. त्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी मायनिंग व्यवस्थापक, पोलिस आणि आरटीओची आहे. त्यामुळे इन्सुली आणि कळणेतील मायनिंगवर प्रशासनाने त्वरीत कारवाई कारावी, तसेच मळेवाड येथे हजारो टन खनिजाचा बेकायदेशीर साठा करून ठेवला आहे. तो साठाही जप्त करण्यात यावा अशी भाजपची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार राहील असेही राजन तेली यांनी स्पष्ट केले. या बाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना दिले.