नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशमधल्या रोहतांग येथील अटल बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी सकाळीच मनाली येथे दाखल झाले होते. बोगद्याच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरदेखील यावेळी उपस्थित होते.
हिमालयाच्या दुर्गम पर्वरांगांमधील डोंगर खोदून अटल बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा ३,०६० मीटर उंचीवर आहे. रोहतांग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी ४७४ किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते. अटल बोगद्यामुळे हे अंतर ४२८ किलोमीटर इतके झाले आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) तयार केला आहे.
पंतप्रधान मोदींनी बोगद्याच्या उद्घाटनापूर्वी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. तसेच मोदींनी यात म्हटले आहे की, हा बोगदा या परिसरातील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवणार आहे.