जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांचा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लिहिलेला अप्रतिम लेख
वैशाख महिन्यात शुक्लपक्षात,येणारी तृतिया म्हणजे अक्षय तृतिया. साडेतीन मुहुर्तामध्ये या दिवसाची गणना होते.
या दिवशी केलेलं शुभकार्य हे फलदायी असतं आणि अक्षय
असतं. नवी खरेदी ,तसेच दान धर्मादी पुण्य कर्मे यांचे फळ हे चिरंतन असते.
खानदेशात या सणाला आखाजी म्हणतात. प्रामुख्याने शेतीप्रधान असलेल्या या प्रांतांत शेतकर्यांचा हा मोठा सण आहे. या दिवशी पाटावर धान्य पसरुन पाण्यानं भरलेल्या मातीच्या घटाची पूजा केली जाते.यास घागर भरणे असेही म्हणतात. घटावरच्या मातीच्या ताटलीत खरबुज,आम्रफल ठेवले जाते.चंपक मोगरा ,आंब्याची डहाळी यांची सुंदर सजावट घटाभोवती करतात. या सर्व विधीला नैसर्गिक आणि भौगोलीक संदर्भ आहेत.नुकताच वैशाख महिना सुरु झालेला असतो.हवेत ऊष्मा असतो. एक प्रकारे वरुण देवतेची ही आराधना असते.माती ही तर शेतकर्यांची माय.
घटाच्या रुपात तिलाही पूजले जाते. या महिन्यात कलींगडे खरबुज, आंबे अशा गारवा देणार्या फळांचे भरपूर ऊत्पन्न असते.म्हणून पूजेत प्रतिकात्मक रित्या ती अर्पण केली जातात.
पुरणपोळी ,आंब्याचा रस, तांदळाची खीर, असा नैवेद्य अर्पिला जातो. माहेरवाशिणी येतात. झाडाला झोका
बांधून ऊंच झोके घेतात. गाणी गातात. असा हा सुंदर
ग्रीष्म ऋतुचे स्वागत करणारा मनभावन सण.प्रामुख्याने हे जाणवते की आपल्या संस्कृतीचे निसर्गाशी किती घट्ट नाते आहे! वसंत सरतो ,ग्रीष्म येतो. नंतर येणार्या वर्षा ऋतुची
बीजे ग्रीष्माच्या उदरात असतात …म्हणून सर्वांचे स्वागत आहे.निसर्गचक्र म्हणजेच जीवनचक्र. ही महान शिकवण या सणांच्या निमीत्ताने निसर्गच मानवाला देत असतो.
बाकी मग या सणाच्या भोवती अनेक कथा गुंफलेल्या आहेत.भगवान विष्णुचा सहावा अवतार परशुराम.परशुरामाचा जन्म अक्षय तृतियेस झाला.कृतयुग,त्रेतायुग व्यापारयुगाची सुरवात अक्षय तृतियेच्या दिवशीच झाली. व्यासांनी गणेशास महाभारत सांगण्याचाही हाच दिवस.
धर्मदास नावाच्या वैश्याने या दिवशी विष्णुची पूजा
केली.नित्यनेमाने दानधर्म करत राहिला. त्याच्या पत्नीने
विरोध केला तरीही तो त्याच्या व्रतापासून ढळला नाही.
पुढच्या जन्मात तो कुशावर्तचा वैभवसंपन्न राजा झाला.
दानी आणि धर्मपरायण राजा म्हणून त्याची सर्वत्र ख्याती झाली.
पूर्वजांचे मनोभावे आदरयुक्त स्मरण या दिवशी केले जाते.
असा हा अक्षय सुखाचे दान देणारा पारंपारीक सण
भक्तीभावाने सर्वत्र साजरा केला जातो.
राधिका भांडारकर पुणे.
.