जागतिक साहित्य कला व्यक्ती विकास मंच लालित्य नक्षत्र वेल समूह सदस्य लेखक-कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम लेख
मराठी माणसाचा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाचा उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस म्हणजे १ मे… कारण १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठी बांधव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करतात. स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरणही या दिवशी केले जाते.
महाराष्ट्र ही साधुसंतांची पावन भूमी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कर्तृत्वाने पावन झालेली भूमी म्हणूनही महाराष्ट्राची ओळख आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आगरकर, शाहू महाराज यासारखे थोर महात्मे या महाराष्ट्राच्या भूमीतच जन्माला आले आहेत. अशा थोर महात्म्यांच्या कर्तुत्वाने त्यागाने आणि बलिदानाने आजचा महाराष्ट्र घडला आहे. छत्रपती शिवरायांच्या अभेद्य किल्ल्यांच्या रांगांनी महाराष्ट्र नटला, सजला आहे. शिवरायांनी बांधलेले अजस्त्र गड… विजयदुर्ग, मालवणचा सिंधुदुर्ग, यासारखे जलदुर्ग म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचातील माणिक मोतीच…आणि मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांचे मंदिर हा तर अमूल्य ठेवाच…महाराष्ट्राच्या माथ्यावरील जिरेटोपच…!
महाराष्ट्र ही संतांची भूमी… संत परंपरेचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचे अभंग मुखामुखात वदत असतात…त्यांच्या अभंगांशिवाय पंढरीची वारी देखील पुढे सरकत नाही. संत एकनाथांनी भारुडे…समाज जागृती करण्याचा स्त्रोतच होती…
संत ज्ञानेश्वरांनी “भावार्थदीपिका” मधून गीतेवर टीका केली आहे, संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी मराठी भाषेत आणले.
*माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।*
*ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।*
म्हणणाऱ्या…अशा एक ना अनेक संत विभुतींनी महाराष्ट्र घडवला आहे. संतांच्या शिकवणीमुळे महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा जपल्या जातात… त्यामुळेच भक्तिभाव ओसंडून वाहत असतो.
*वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे* असे म्हणत संत तुकाराम यांनी वृक्ष वेली, वनचर यावर देखील प्रेम करायला शिकवले. *टिळा टोपी घालुनी माळा, म्हणती आम्ही साधू… दया धर्म चित्ती नाही, ते जाणावे भोंदू…* असे म्हणत तुकाराम महाराजांनी साधुसंत म्हणवून घेणारे भोंदू उघडे पा… डोक्यावर टिळा लावून टोपी घालून भोंदूगिरी करणाऱ्यांविरुद्ध समाज जागृती केली. महाराष्ट्रात असलेल्या तिर्थस्थळांमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य तीर्थस्थान असल्यासारखे वाटते आहे. महाराष्ट्रातील वारकऱ्यांची ओसंडून वाहणारी भक्ती पंढरपुरात पहावयास, अनुभवण्यास मिळते. वारकऱ्यांचा भक्तीचा मळा या पंढरपुरातच फुलतो… महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे ही शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात… त्यात माहूर, तुळजापूर, कोल्हापूर हि पूर्ण पीठे आणि वणीची सप्तशृंगी अर्ध शक्तीपीठ. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत. शिर्डीचे श्री.साईबाबा, अक्कलकोटचे श्री.स्वामी समर्थ ही तर महाराष्ट्रीयनांच्या मनामनातील विश्वासाची श्रद्धास्थाने आहेत.
महाराष्ट्राला समाज कार्यकर्त्यांची देखील खूप मोठी परंपरा असून बाबा आमटे, साधनाताई आमटे, डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे डॉ.विकास आमटे या परिवाराने तर प्रगती विकासापासून शेकडो मैल दूर असणाऱ्या आदिवासींसाठी अतुलनीय असे कार्य करत त्यांना समाजाच्या प्रवाहात आणले. आदिवासींसाठी शिक्षण, आरोग्य आदी सुविधा उपलब्ध करून देत त्यांचे जीवनमान घडविले. अशा अनेक समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिलेली आहे. महाराष्ट्राचे भूमीने अनेक कलाकारांना, साहित्यिकांना जन्माला घातले आहे. ज्यांनी महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार नेले. दादासाहेब फाळकेनी तर चित्रपटसृष्टीच अजरामर केली. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या गायनाने श्रोत्यांना वेड लावले. नाना पाटेकर, माधुरी दीक्षित अशा अनेक मराठी कलाकारांनी महाराष्ट्रात स्वतःची ओळख तर निर्माण केलीच, परंतु जगाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या नावाचा झेंडा रोवला. खेळाच्या बाबतीतही महाराष्ट्र मागे राहिलेला नाही. प्रत्येक खेळात महाराष्ट्राचे खेळाडू चमकत असून कबड्डी सारख्या खेळात महाराष्ट्रीयनांनी आपली छाप सोडलेली आहे. त्याच बरोबर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यासारख्या ताऱ्यांनी तर क्रिकेट विश्वात संपूर्ण जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली… आणि महाराष्ट्राचा दबदबा आज पर्यंत क्रिकेट क्षेत्रात बनवून ठेवला.
महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई इतर देशाच्या अर्थकारणातील मुख्य बाजू असून बॉलिवूड म्हणजे चित्रपटसृष्टी मुंबईत असल्याने अरबो रुपयांची उलाढाल मुंबईत होत असते. अनेक सितारे या चित्रपटसृष्टीतून पुढे येत असतात, चित्रपट सृष्टीला लागणारे अलौकिक सौंदर्य स्टुडिओ सुंदर स्थळे ही मुंबईच्या आजूबाजूला व मुंबईत असल्याने मुंबई हे चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र बनले आहे. चित्रपट सृष्टीमुळे मुंबापुरीला वेगळे वलय प्राप्त झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात देखील महाराष्ट्राचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मुंबई सारखी मोठी बाजारपेठ महाराष्ट्रात उपलब्ध असल्याने आणि उद्योग धंदे, व्यावसायिक तसेच नोकरदार लोक मुंबईकडे…. पर्यायाने महाराष्ट्राकडे आकर्षित होतात. त्यामुळे देशभरातील लोकांना उपजीविकेचे साधन म्हणजेच… महाराष्ट्र राज्य बनले आहे.
उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सारखे सरोवर हा अद्भुत नमुना होय. लोणार सरोवर आज वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झालेले आहे. शनिशिंगणापूर सारखे शनिचे देवस्थान तेथील गावात घरांना दरवाजे, खिडक्या नाहीत म्हणून आश्चर्य बनले आहे….एवढी अखंड श्रद्धा शनीच्या भाविकांमध्ये दिसून येते… ती देखील महाराष्ट्रातच. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेले मोगल शैलीची कलाकुसर दाखविणारे औरंगाबाद…म्हणजेच आताचे संभाजीनगर हे शहर देखील महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. बिबीका मकबरा, त्याच बरोबर या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे शहराला तब्बल ५२ प्रवेशद्वारे आहेत…. रेल्वेची प्रथम स्थापना १६ एप्रिल १८५७ रोजी महाराष्ट्रात मुंबई–ठाणे रेल्वे सुरू करून मुंबईत झाली होती. गोरगरिबांना मुंबई आसरा देणारे स्थान आणि आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी देखील मुंबई शहरात आहे… ती म्हणजे धारावी. सांस्कृतिक वैभवाने नटलेले पेशवेकालीन परंपरा लाभलेले… विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले… पुणे शहर हे देखील महाराष्ट्राचा मानबिंदू ठरले आहे. शैक्षणिक दृष्ट्या अत्याधुनिक सोयी सुविधा, जुनी विद्यापीठे, व शिक्षणाचे अनेक पर्याय खुले असलेले शहर म्हणून पुणे नावारूपास आले आहे. द्राक्ष व कांद्यासाठी प्रसिद्ध असणारे नाशिक शहर हेदेखील महाराष्ट्रातील प्रमुख आकर्षण असून नाशिक मधील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे यामुळे नाशिकला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे.
परमेश्वराने मुक्तहस्ताने उधळण केलेला व अमाप निसर्गसौंदर्य लाभलेले पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे… महाराष्ट्रातील कोकण… कोकणातील स्वच्छ, सुंदर, पांढऱ्या वाळूचा विस्तीर्ण समुद्रकिनारा… बारमाही वाहणाऱ्या मोठ मोठ्या नद्या… नैसर्गिक तलाव… धरणे…धबधबे, झरे..नद्यांचे उगम… असे अनेक जलस्त्रोत असणारे कोकण हे खऱ्या अर्थाने पर्यटकांना खुणावत असते. अक्षरश: कोकणातील निसर्ग सौंदर्ययांने पर्यटकांना भुरळ पडलेली आहे. कोकणातील हापूस आंबा हा तर देश-विदेशात ख्याती मिळवून आहे. देवगड रत्नागिरीचा हापूस अनेकांचे जिभेचे चोचले पुरवतो. त्याचबरोबर तळकोकणातील डोंगर रांगांमधील काजू आजही अनेकांच्या पसंतीस उतरलेला आहे. कोकणातील उतरत्या छपरांची घरे… शेकडो वर्ष पूर्वीपासून कोकणी लोकांच्या मनात श्रद्धेचे स्थान बनलेली पुरातन मंदिरे देखील कोकणी लोकांच्या मनात असलेली परमेश्वरावर बद्दलची श्रद्धा, भक्ती आणि भावना दाखवून देतात.
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला सिंधुदुर्ग जिल्हा तर कोकणची शान आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळख असलेले आणि संत्र्यांचे शहर म्हटले जाणारे नागपूर आपले एक वेगळे स्थान बनवून उभे आहे. नंदुरबारची लाल मिरची, अकोलाचा कापूस तर गडचिरोली, चंद्रपूर हे वनसंपदेसाठी प्रसिद्ध आहेत.
माझ्या महाराष्ट्रातील औरंगाबाद (संभाजीनगर) शहर… अजंठा वेरूळची पुरातन लेणी, लोणावळा, खंडाळा,महाबळेश्वर, चिखलदरा, आंबोली अशी थंड हवेची ठिकाणे ही पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. *हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट… सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट* अशा गाण्यांनी दुमदुमणारे घाट….महाराष्ट्रातच दिसतील. समुद्रप्रेमी पर्यटकांना तर संपूर्ण कोकणाला लाभलेला सागरकिनारा खुणावत असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, वेळागर, मोचेमाड पासून सुरू झालेला समुद्रकिनारा रत्नागिरीतील गणपतीपुळे, दापोली, हरिहरेश्वर, रायगड मधील अलीबाग, मुरुड जंजिरा, अशा अनेक रमणीय स्थळांची भ्रमंती करून आणतो. निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेलं सौंदर्याचं दान जर पहावयाचे असेल तर पर्यटकांना माझ्या महाराष्ट्रात जागोजागी पाहता येईल. सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्या डोंगरावरून दिसणारे अवर्णनीय असे दूरवरचे सागरकिनारे हे माझ्या महाराष्ट्रातच पहावयास मिळतील.
*जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा*
कवि राजा बढे यांनी लिहिलेले… संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले…व शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेले स्फूर्तिदायक गीतच गौरवशाली महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि विविधता दाखवून देते…
अशा या गौरवशाली महाराष्ट्राचा प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीला सदैव अभिमानच आहे….राहील…!
(दीपि)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६