जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका प्रा.सौ.सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा
अभिमान वाटतो किती रे सांगू कसा राजा…
सुजलाम सुफलाम होती पहा ना एकेकाळी भूमी
कळत नाही कशामुळे रे झाली पहा हानी..
जंगल गेले नद्या ही गेल्या झुळझुळणारे पाणी
वृक्षच आता नाही राहिले जाता पहा रानी…
होले गेले पोपट गेले गेल्या पहा चिमण्या
मधमाशा ही उजाड होऊन गेल्या त्यांच्या राण्या..
हिरवाईचे दाट छत्र ते गेले वड पिंपळ
ओसच पडले नदी नि नाले करंगळी ते नळ…
डुंबत होतो मनसोक्त रे मस्त पन्हाळा खाली
रूसला आता पाऊस राजा येतो पहा अकाली..
काय मी सांगू किती मी सांगू झालो पहा विव्हळ
विहिरी आणि नद्या गाठती हिवाळ्यातच तळं
शेती झाली उजाड सारी भकास झाला बळी
माहित नाही शिरला कसा रे महाराष्ट्री या “कली…”
गिरण्या गेल्या कामगार ते देशोधडी लागले
सातपिढ्यांच्या करूनी सोयी नेते पहा थकले
वैभव सारे निघून गेले येईल का परतुनी
सय येते रे वैभव सारे जुने तुझे आठवुनी…
संपन्नतेचे स्वप्न पाहतो वेडी प्रजा रे आम्ही
येईल का परतुनी शिवाजी संभाजी कोणी गुणी
कालचक्र ते येते परतून होते पूर्ण वर्तुळ
परतून येवो राजा शिवाजी आणि त्याचे गोकुळ ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १ मे २०२२
वेळ : सकाळी ११ : ४१