मालवण :
शाळा हे मंदिर आहे. शिक्षण हा विकासाचा मार्ग आहे. शिक्षणासोबत वेळेला महत्व द्या. जबाबदारीची, कर्तव्यांची जाणीव ठेवा. आपल्या प्रयत्नांना मेहनत व प्रमाणिकपणाची जोड देऊन यशस्वी व्हा. ‘जो शिकेल तो वाचेल’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करा. उच्चशिक्षित होऊन प्रगती साधा. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.
सौ. हिराबाई भास्कर वरसकर विदयामांदिर व वराड कला वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालयच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात मालवण वराड येथे ते शनिवारी बोलत होते.
सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पेट्रोलियम अँड गॅस वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप मयेकर, कमल राजाध्यक्ष ट्रस्ट मुंबईचे ट्रस्टी प्रफुल्ल कालेलकर, प्रणव कालेलकर, जि. प. सदस्य संतोष साठविलकर, मा. सभापती अजिंक्य पाताडे, मा. पस सदस्य विनोद आळवे, वराड ग्रामस्थ संघ मुंबई अध्यक्ष अरुण गावडे, उपाध्यक्ष भिकाजी वराडकर, शालेय समिती चेअरमन केशव परुळेकर, राजन माणगावकर, मुख्याध्यापक तानाजी पाटील, सुरेश चौकेकर, प्रदीप म्हाडगूत, दत्ताराम बिलये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वराड ग्रामस्थ संघ मुंबई अध्यक्ष अरुण गावडे यांच्या हस्ते ना. नारायण राणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात ना. राणे म्हणाले की शाळेचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम गावातील लोक एकत्र येऊन एखादया सणाप्रमाणे साजरा करताय हे पाहून आनंद झाला. वराड पेंडूर ही गावे माझ्या राजकिय कारकिर्दीतील माझा बालेकिल्ला असलेली गावे आहेत. मी प्रथम आमदार होण्यामध्ये या गावांचा मोलाचा वाटा आहे. गावात शाळा सुरू करणे सुंदर इमारत बांधणे आणि शाळेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम पुढे सुरू ठेवणे हे पवित्र कार्य वाखाणण्याजोगे आहे. कोकणची ओळख बुद्धिजीवी माणसाचा कोकण म्हणून केली जाते. पण आपल्या कोकणी माणसाने याचा कितपत वापर केला हा मात्र मोठा प्रश्न आहे. शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे. मुले मुली उच्चशिक्षण घेत आहेत त्यामुळे कोकणची प्रगती होत आहे. शिक्षणा सोबत गावचा विकास हा रस्त्यावर अवलंबून असतो पण आजचे सत्ताधारी साधा रस्ता बनवू शकत नाहीत ते विकास काय करणार, अशी टीकाही त्यांनी केली.
प्रत्येक गावात जावे तुमच्यासोबत बसावं बोलावं गप्पा माराव्या अस खुप वाटतं. परंतु वेळेअभावी ते शक्य होत नाही. आता तामिळनाडू, कर्नाटक, केरळ व त्यानंतर जम्मू काश्मीर दौरा आहे. मात्र आपल्याला भेटून देव वेतोबाचे दर्शन घेऊन नवी ऊर्जा मिळाली. असेही ना. राणे म्हणाले.
१९९० पासून ना. राणेंचे सहकारी अशी ओळख असलेले जेष्ठ कार्यकर्ते अशोक परब तसेच डॉक्टरेट प्राप्त केलेली वराड गावची कन्या प्रशालेची माजी विध्यार्थीनी सोनाली पावसकर यांचा मंत्री नारायणराव राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश चौकेकर यांनी केले.