सावंतवाडी :
तालुक्यातील मळेवाड जकातनाका येथे आयोजित ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 मधील महिलांच्या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रीय काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या हस्ते संपन्न झाला.
कोरोनामुळे गेली २ वर्ष मळेवाड येथे महोत्सव करण्यात आला नव्हता. मात्र यावर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 चे 30 एप्रिल ते 4 मे 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मळेवाड जकात नाका येथील श्री गणेश मंदिरात सत्यनारायण महापूजा चे आयोजन केले होते. दुपारच्या सत्रात लहान मुलांसाठी फनी गेम महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ सन्माननीय राष्ट्रीय काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन करण्यात आला.
ग्रामपंचायत कडून ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देण्यासाठी मान्यवरांचे सुपारी चे रोप देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी साक्षी वंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांसाठी असलेल्या विविध योजनांचा फायदा घ्या. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा कोणत्याही योजनेसंदर्भात माहिती हवी असल्यास किंवा लाभ घ्यायचा असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ही केले.
यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, सदस्य स्नेहल मुळीक, गिरिजा मुळीक, सानिका शेवडे, कविता शेगडे, सीआरपी प्राची मुळीक आदी उपस्थित होते.
मुलांसाठी व महिलांसाठी फनी गेमचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना वंजारी यांनी भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. पैठणीच्या फनी गेम चे सूत्र संचालन जुईली पांगम यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपसरपंच मराठी यांनी केले.