*मुलांना केवळ मार्क्सवादी बनविण्यापेक्षा संवेदनशील आणि सामाजिक चेतना जागृत करणारे उत्तम नागरिक बनवा- विकास सावंत यांचे प्रतिपादन…*
*सावंतवाडी :*
सध्याच्या शैक्षणिक प्रवाहात प्रत्येक पालक आपल्या पाल्याला केवळ गुणात्मक दृष्टीने विकसित करण्यासाठी खटाटोप करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन केले असता बालकांना मार्क्सवादी बनवण्यापेक्षा त्यांना सभोवतालच्या घडामोडींचे आकलन होऊन चिंतनशील विचार प्रणाली त्यांच्यात निर्माण करून एक आदर्श नागरिक घडविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांनी केले आहे.
सावंतवाडीत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी प्राचार्य डॉ. अनंत रावजी शिंदे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि प्राचार्य ज. बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत बोलत होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य प्रा. सतीश बागवे, माजी मुख्याध्यापिका व संस्था सदस्य सौ. वसुंधरा मुळीक, माजी मुख्याध्यापक व सत्कारमूर्ती बी. एस. पाटील, सत्कारमूर्ती बी.व्ही. मालवणकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपप्राचार्या सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक एस.पी.नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे शिक्षक बाबुराव वासुदेव मालवणकर यांना सन २०२१-२२ चा प्राचार्य डॉ.अनंत रावजी शिंदे आदर्श शिक्षक पुरस्कार तर बाळासाहेब सिताराम पाटील यांना सन २०२०-२१ चा प्राचार्य डॉ.अनंत रावजी शिंदे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने डॉ.दिनेश नागवेकर पुरस्कृत प्राचार्य ज.बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थी व विद्यार्थीनी पुरस्कार अनुक्रमे समीर मयुरेश पटवर्धन (इयत्ता दहावी),आदिती दिनेश चव्हाण (इयत्ता दहावी), वरदा तानाजी सावंत (इयत्ता दहावी), रिद्धी संजय माळकर (इयत्ता दहावी), सार्थक नम्रता वाटवे (इयत्ता नववी), अभिजित उत्तम कुडव (इयत्ता सातवी), अनुष्का गंगाराम निगुडकर (इयत्ता सातवी), योगेश विवेकानंद जोशी (इयत्ता सहावी), अस्मी प्रवीण मांजरेकर (इयत्ता पाचवी) ,तेजराव महेंद्र दळवी (इयत्ता बारावी- विज्ञान), विधिता वैभव केंकरे (इयत्ता बारावी-कला), प्रणाली नथुराम आयरे (इयत्ता बारावी- विज्ञान) यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेले पालक प्रवीण मांजरेकर, वैभव केंकरे यांनी पालकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पुरस्कारार्थी यांच्या वतीने माजी मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी तर सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार, पुनम कोचरेकर यांनी केले. उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.