*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे यांचा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लिहिलेला अप्रतिम लेख*
*महाराष्ट्र दिन व कामगार दिन**
**१ मे २०२२*
मंगल देशा पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा
श्री महाराष्ट्र देशा !
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले, त्यामुळे मराठी माणसे चिडली. सगळीकडे लहान मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होऊ लागला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात एकदम तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारण कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात जमला. प्रचंड जनसमुदाय, चर्चगेट स्थानकावरून एक तर दुसरा बोरीबंदरकडून, गगनभेदी घोषणा देत तेथे जमला व निषेध करू लागला. मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. पण सत्याग्रही अढळ होते. पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले. नंतर पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला आणि ह्या गोळीबारात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, १०६ हुतात्मे झाले.
ह्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६० रोजी, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. संयुक्त महाराष्ट्र समितीनेच आपल्या राज्याचे नाव “महाराष्ट्र” असे ठेवले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. राज्याची स्थापना कामगार दिनी करण्यात आली तो दिवस म्हणजे १ मे १९६०.
नंतर १९६५ मध्ये फ्लोरा फाउंटनच्या चौकात १०६ हुतात्मे झालेल्यांचे तेथे स्मारक उभारण्यात आले. तोच आपला हुतात्मा चौक.
प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा. जय महाराष्ट्र.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717