आम.केसरकरांचे निकटवर्तीय माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्यावर जबाबदारी
सावंतवाडीत आम.दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिमखाना मैदानावर उभारल्या गेलेल्या ऑक्सिजन प्लांट व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी साठी दिलेल्या नवीन अँबुलन्स चा लोकार्पण सोहळा आम.दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्या होणार आहे. सावंतवाडीत पार पडणाऱ्या लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी आम.दीपक केसरकर यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू समजले जाणारे सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्यावर सोपविली आहे.
राजन पोकळे हे मागील नगरपालिका निवडणुकीनंतर राजकारणात म्हणावे तेवढे सक्रिय नव्हते. परंतु आम.केसरकर मंत्रीपदी असताना बरीचशी धुरा राजन पोकळे हाकत होते. प्रकाश परब यांच्या निधनानंतर चांदा ते बांदा योजनेचे कामकाज देखील राजन पोकळे सांभाळत होते. परंतु नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडीच्या वेळी राजन पोकळे यांचे नाव मागे पडले आणि तद्नंतर केसरकर यांचेही मंत्रिपद गेले त्यामुळे राजन पोकळे हे पालिकेच्या कामकाजात आणि शिवसेनेच्याही कार्यक्रमात सक्रिय दिसत नव्हते. परंतु आम.दीपक केसरकर यांच्याकडे नाव बदलून आलेली (चांदा ते बांदा) रत्नसिंधु योजनेचे अध्यक्षपद पुन्हा आले आणि पर्यायाने त्यातील अनुभव असलेले राजन पोकळे देखील शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय झाले.
शिवसेनेच्या संघटन शिस्तीप्रमाणे शिवसेना शहरप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्यावरच विकास कामे , भूमिपूजन, उद्घाटन आदी नियोजनाची जबाबदारी असते. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राजन पोकळे यांची भूमिका महत्त्वाची ठरते, त्यामुळे आम.दीपक केसरकर यांनी राजन पोकळे यांना शिवसेनेच्या नियोजनामध्ये सक्रिय केलं आहे. उद्या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्मासंदर्भात आम.केसरकरांच्या कार्यालयात चौकशी केली असता “राजन पोकळे यांच्याशी बोला” असे उत्तर मिळते त्यामुळे राजन पोकळे पुन्हा एकदा नव्या दमाने आम. केसरकरांच्या ताफ्यात दाखल झाल्याचे दिसून येते.