*नुसती विश्वप्रार्थना म्हणून सर्व काही साध्य होईल का?*
*नुसती विश्वप्रार्थना म्हणून सर्वकाही साध्य होईल असे समजणे म्हणजे निव्वळ भ्रम आहे. इंग्लिशमध्ये एक सुंदर म्हण आहे.*
*If wishes were horses*
*beggars would ride them.*.
*याचा भावार्थ असा की,नुसत्या इच्छा करून किंवा मनोराज्य करून सफलता प्राप्त होत नाही. विश्वप्रार्थनेला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे.पक्षाला आकाशात सुखाने विहार करायला दोन पंखांची गरज असते. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाला प्रार्थना आणि प्रयत्न या दोन पंखांची नितांत गरज असते. जीवनविद्या सांगते,माणसाने त्याच्या वाट्याला आलेले काम आवडीने व प्रामाणिकपणे अगदी जीव ओतून केले पाहिजे.प्रत्येक माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे ते हे की,माणसाचा जन्मच काम करण्यासाठी झाललेला आहे, त्यासाठीच त्या विधात्याने माणसाला पोट दिलेले आहे.हा ईश्वरी व्यवस्थेचाच एक अविभाज्य भाग आहे.म्हणून काम करण्यात किंवा कष्ट करण्यात टाळाटाळ करणे म्हणजे प्रत्यक्षात दिव्य निसर्गव्यवस्थेशी प्रतारणा करणे होय.अशी प्रतारणा केल्याने माणसाच्या जीवनात समस्या निर्माण होणे अपरिहार्य आहे. म्हणून काम करण्याला,कष्ट करण्याला म्हणजेच प्रयत्न करण्याला पर्याय नाही हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे ठरेल.म्हणूनच जीवनविद्या सांगते,देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे,म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे.विश्वप्रार्थनेला प्रयत्नांची जोड मिळाली की,माणसाचे जीवन सर्वांगाने व सर्वार्थाने यशस्वी,सुखी व समृद्ध होईल,ही काळ्या दगडावरची रेष आहे.थोडक्यात,माणसाने रिकामपणी जास्तीत जास्त विश्वप्रार्थना म्हणावी व कामाच्या वेळात त्याने मनापासून व प्रामाणिकपणे कसून काम करावे, असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. थोडक्यात,जीवनविद्या सांगते, “मुखाने नाम,हाताने काम व हृदयात राम” अशी माणसाच्या जीवनाची बैठक असली पाहिजे.*
*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*