गरजूंच्या मदतीसाठी उपक्रम; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान…
सावंतवाडी
सिंधुदुर्ग हातभार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने उद्या येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या पटांगणावर विनोदी मालवणी “शबय” या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६:०० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहेत. गरीब कुटुंबातील कॅन्सरग्रस्त, कीडणीग्रस्त यासारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रस्टच्यावतीने हा उपक्रम घेतला जात आहे. तरी रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, व गरजूंच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी केले आहे.
येथील आरपीडी हायस्कूलच्या रंगमंचावर “रेम्बो फ्रेंड सर्कल” निर्मित दोन अंकी तुफान विनोदी मालवणी नाटक सादर करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष संजु परब यांनी हे नाटक पुरस्कृत केले आहे. तर मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी नगराध्यक्ष प्रेमानंद साळगावकर, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा,माजी नगरसेवक सुधीर आरीवडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अभिमन्यू लोंढे (पत्रकार भूषण), बाबली गंवडे (समाज रत्न), डॉ.अभिजीत चितारी (हृदयरोगतज्ज्ञ), बबन उर्फ बंडया परब (युवा उद्योजक), डॉ. नेत्रा सावंत(जीवन संजिवनी), शिवप्रसाद परब(समाज भूषण), डॉ. चंद्रकांत सावंत(शिक्षक भूषण), सौ. संजना कांबळी (आरोग्य सेवारत्न), वसंत जाधव(क्रीडा रत्न),कु. विजय तुळसकर (बालरत्न) अशा मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर, जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे, संस्थापक खजिनदार नयनेश गावडे, संस्थापक सचिव एकनाथ चव्हाण आदींनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.