कणकवली ते पत्रादेवी पर्यंत संयुक्त पाहणी दौरा देखील पूर्ण
कणकवली, कुडाळ मधील प्रलंबित गटारांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना
कणकवली:
पावसाळ्याच्या पूर्वी महामार्ग चौपदरीकरण दिलीप बिल्डकॉन ठेकेदार कंपनी कडून महामार्गाच्या काही खचलेल्या व खड्डे पडलेल्या भागांना डांबरीकरणाचे पॅचवर्क चे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने स्थानिक जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार गटार व त्या अनुषंगाने कामे देखील लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणांच्या सूत्रांकडून देण्यात आली.
कणकवली शहरात आज बुधवारी सकाळी स्टेट बँक, पटवर्धन चौक, तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोरील सह अन्य भागात डांबरीकरणाने पॅचवर्क करण्यात आले. याचबरोबर कणकवलीतील हॉटेल मंजुनाथ शेजारील अर्धवट स्थितीत असलेले गटाराचे काम, लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप कुडाळ कडील काम, तायशेटे हॉस्पिटल कडील तुटलेल्या गटाराचे काम ही कामे तातडीने पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्याच्या सूचना देखील महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता यांनी दिले आहेत. याचसोबत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी जानवली ब्रिज ते पत्रादेवी पर्यंत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पाहणी दौरा केला.
मान्सूनपूर्व कामे व अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना याचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच खारेपाटण येथे महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी शिवनिवार व शाखा अभियंता डी.जी.कुमावत यांच्या सोबत खारेपाटण सुख नदी येथे झालेल्या ब्रिजची संयुक्तरीत्या पाहणी करण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित असलेले सरपंच रमाकांत राऊत यांनी मुंबई ते गोवा जाणाऱ्या बाजूने ब्रिज चालू करू नये अशी मागणी केली. कारण शाळेतील मुलांना शाळेत जाण्यासाठी तसेच रेल्वे स्टेशनला जाणार्या लोकांना अडथळा निर्माण होत असून सदरचा रस्ता रुंदीकरण करावा असे त्यांनी सुचवले.
पावसाळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राचे सहाययक पोलिस निरीक्षक अरुण जाधव व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. कांबळे व श्री साळुंखे यांच्यासह पत्रादेवी ते कणकवली पर्यंत पाहणी दौरा करण्यात आला. यात अपघात प्रणव क्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे सूचना देणारे बोर्ड, स्पिड बोर्ड, बॉटल नेक बोर्ड, बॅरिकेटिंग, रंबलर ,थर्मा प्लस्टिक पेंटिंग आदि उपायोजना ठेकेदार कंपनीकडून तातडीने करून घेण्याच्या सूचना वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी दिल्या आहेत. तसेच महामार्ग क्रमांक बोर्ड, महामार्ग वर आलेल्या झाडांच्या फांद्या छाटनी करण्याचे तसेच पावसाळ्यात होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधित यावेळी सूचना देण्यात आल्या. प्राधिकरणने सदर सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्याचे सांगितले.