वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील साप्ताहिक ‘किरात‘ ट्रस्टने ‘लोकप्रतिनिधींकडून माझ्या अपेक्षा‘ या विषयावर आयोजित केलेल्या खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सावंतवाडी येथील किशोर वालावलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लोकशाही व्यवस्थेची स्थिती आणि गती समजून घ्यावी या उद्देशाने ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेला राज्याच्या विविध भागातून अनेक निबंध लेखककडून भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत द्वितीय-पांडुरंग दळवी (नेमळे), तृतीय-शरद प्रभू (गोरेगांव), उत्तेजनार्थ-अमित कुंटे (कुडाळ), हर्षदा कुडव (आरवली) यांनी पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अधिव्याख्याता डॉ.संजिव लिगवत, राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक सत्यवान पेडणेकर, वेंगुर्ला आर.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजचे प्रा.महेश बोवलेकर, लेखक व कवी वीरधवल परब यांनी केले. या स्पर्धेतून विविध प्रकारची मते, आग्रह आणि अपेक्षा तसेच वस्तुस्थिती याबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद, प्रतिसंवाद, चर्चा यापुढेही होत राहीलच असे दिसून आले आहे. भारतीय लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट होण्याच्या दृष्टीने आणि मतदारांमध्ये त्यांच्या अधिकार हक्कांविषयी जाणिव जागृती होणे, यासाठी अशा प्रकारच्या चर्चा वारंवार होत रहाणे अत्यावश्यकच असल्याचे मत परीक्षकांनी व्यक्त केले.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांना १४ मे रोजी वेंगुर्ला-कॅम्प येथील नगरपरिषदेच्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात होणा-या किरातच्या शताब्दी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.