युवराज लखमराजे भोसले यांचा भाजपामध्ये प्रवेश
सावंतवाडी संस्थानचे युवराज तसेच कै.शिवरामराजे भोसले यांचे नातू लखमराजे भोसले यांचा आज भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला. दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडीतील राजघराण्यातील युवा चेहरा भाजप मध्ये येणार, अशी वाच्यता केली होती त्यामुळे युवराज लखमराजे भोसले यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झालेला होता. भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यात प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष यांच्या शब्दांना प्रचंड वजन असते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केलेली वाच्यता आणि सावंतवाडी विधानसभेसाठी भविष्यातील युवा चेहरा म्हणून युवराज लखमराजे भोसले यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे गेली काही वर्षे सावंतवाडी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी केलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व युवा नेते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना पक्षातच नवीन आव्हान उभे राहिल्याचे चित्र समोर येत आहे.
सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघातून गेली तीन आमदारकीच्या टर्म सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निर्विवाद जिंकलेले आहेत. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर दीपक केसरकर उमेदवार म्हणून उभे ठाकले तर त्यांच्यासमोर त्यांना टक्कर देणारा तोडीस तोड उमेदवार भारतीय जनता पक्षाला देणे भाग होते. संजू परब यांनी सावंतवाडी विधानसभेसाठी केलेली मोर्चेबांधणी लक्षात घेता त्यांनाही कार्यकर्त्यांकडून व भारतीय जनता पक्षाच्या मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. सावंतवाडी मतदार संघात झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व अलीकडेच पार पडलेल्या दोडामार्ग नगर परिषद निवडणुकीत भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले होते. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी मतदार संघाचे आमदार भाजपाचा असावा अशी आशा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व नेते मंडळींना वाटू लागली आहे. युवराज लखमराजे भोसले यांचा माजी मुख्यमंत्र्यांसहित भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर नेत्यांच्या समक्ष भाजप प्रवेश घडवून आणत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी विधानसभेसाठी नवा चेहरा म्हणून युवराज लखमराजे भोसले यांना पुढे आणले आहे. युवराज लखमराजे भोसले यांचे आजोबा कै. शिवराम राजे भोसले हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. शिवराम राजे भोसले यांनी आपली हयात काँग्रेसमध्येच घालवली, त्यानंतर मात्र शिवराम राजे भोसले यांच्या पत्नी सत्वशिलादेवी भोसले राणीसाहेब यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे राजघराण्यातून तदनंतर कोणीही निवडणुकीसाठी उभे राहिलेले नव्हते किंवा राजकारणात प्रवेशकर्ते झाले नव्हते. युवराज लखम राजे भोसले यांच्या रूपाने राजघराण्यातील नवा चेहरा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात प्रवेश करतांना दिसून येत आहे.
युवराज लखमराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने भविष्यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून शिवराम राजे भोसले यांच्या आमदारकीचा वारस म्हणून भारतीय जनता पक्षाकडून युवराज लखमराजे भोसले यांना पुढे आणण्याची चाल खेळली गेली, तर नवल वाटू नये. सावंतवाडी मतदार संघातील एक निष्कलंक चेहरा म्हणून युवराज लखमराजे भोसले यांना जिल्हाध्यक्ष राजन तेली सावंतवाडी दोडामार्ग मतदार संघातून विधानसभेचा उमेदवार म्हणून नक्कीच पुढे आणू शकतात. राजघराण्याचा वारसा लाभलेले युवराज लखमराजे भोसले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून येत्या विधानसभेत पुढे आले तर त्यांना नक्कीच एक निष्कलंक व्यक्ती म्हणून मतदारांचाही प्रतिसाद मिळेल, अशी शाश्वती वाटत आहे. येत्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवराज लखमराजे भोसले यांचा भाजप प्रवेश भाजपाच्या पथ्यावर पडण्याची पडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सावंतवाडी मध्ये पुन्हा एकदा फ्रंट सीटवर बसण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते.