You are currently viewing जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून साहित्य प्रेरणा कट्टा आजगावची अठरावी सभा थाटात संपन्न

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून साहित्य प्रेरणा कट्टा आजगावची अठरावी सभा थाटात संपन्न

“मी माझं जीवन लांबवू पहातोय, याचे एकमेव कारण म्हणजे मला अजून खूप पुस्तकं वाचायची आहेत आणि त्यासाठी मला अधिकचा वेळ हवाय. या पुस्तकांनी मला घडवलंय आणि ही पुस्तकांची आवड मला माझ्या गुरुजनांनी लावलीय. श्रीकृष्ण पुराणिक गुरुजी, परमानंद शेटये सर आणि मंगेश आंबिये सर यानी मला पुस्तकांच्या वाटेवर आणून सोडलं आणि मग ही वाट माझी जीवनवाट बनली.” साहित्यिक विनय सौदागर हे आजगाव येथील मराठी ग्रंथालयात बोलत होते. निमित्त होते आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची अठरावी सभा.
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रारंभी मराठी ग्रंथालय आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. मधुकर घारपुरे यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यानंतर डाॅ. सुधाकर ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली साहित्य कट्टयाची सभा संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचा परिचय करून दिला.
डाॅ. सुधाकर ठाकूर यानी पुस्तकां विषयीच्या आपल्या तीन कविता वाचून दाखवल्या. तसेच “आपण नियमित रोज चार-पाच तास वाचन-लेखन करतो. ग्रेस, व्यंकटेश माडगूळकर, आरती प्रभू हे माझे आवडते साहित्यिक असून मी शक्यतो वाचनालयातीलच पुस्तके वाचतो. कारण ती परत करायची असल्याने लवकर वाचून होतात,” असे सांगून त्यांनी पुस्तक वाचनाचे अनेक कंगोरे उलगडून दाखवले.
डाॅ. घारपुरे यांनीही आपले पुस्तक वाचना विषयीचे मत मांडले. तसेच आपल्या ‘प्रेम अक्षरावर करा ‘ या कवितेच्या प्रती उपस्थित साहित्य प्रेमींना दिल्या.
सभेला रामचंद्र झाटये,अनिल निखार्गे,एकनाथ शेटकर ,चंद्रकांत गवंडे ,प्रकाश वराडकर ,ईश्वर थडके ,रविंद्र अटरे ,दत्तगुरू कांबळी, सोमा गावडे ,स्वप्नील वेंगुर्लेकर, एस्. आर. मावळंकर,सोमनाथ गावडे, श्रीपाद सामंत ,अंकुश आजगावकर, सौ.प्रिया आजगावकर, सौ.अंकिता वाडकर, सौ.देवयानी आजगावकर, सौ.मीरा आपटे, सौ.अनिता सौदागर , सौ.मीरा ठाकूर ,शुभंकर ठाकूर कु.मृणाल ठाकूर असे साहित्य प्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा