अन्यायकारक सिक्युरीटी डिपाॅझीट ग्राहकांनी भरु नये .
सिक्युरीटी डिपाॅझीट बिलाची भाजपा होळी करणार —- प्रसंन्ना देसाई , जिल्हा सरचिटणीस – भाजपा .
महावितरणने मार्च महिन्याच्या बिलासोबत स्वतंत्र डिपाॅझीटची बीले पाठविल्याने ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे . व्याज व ग्राहकांच्या फायद्याचे गणित सांगुन महावितरण कोट्यावधी रुपये ग्राहकांच्या खिशातून काढण्याचा कट रचला आहे . या अवास्तव बिलामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे . कारण यापूर्वी कोरोनाच्या काळात २०० युनीट मोफत विज देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती . त्यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिलात सवलत मिळेल या भाभड्या आशेने बील भरण्यास उशीर केला , आणि त्यानंतर उर्जामंत्र्यांनी घुमजाव केले . या सर्व गुंतागुंतीत बील रक्कम वाढली .तरीही ग्राहकांनी टप्प्याटप्प्याने व्याजासह बीले भरली . कोरोनाच्या काळात ऑनलाईन बिले भरण्याच्या महावितरणच्या आवाहनाही ग्राहकांनी साथ दिली . काहींनी व्याजासह रक्कम भरून वीजपुरवठा सुरळीत ठेवला .
परंतु आता महावितरणने कोळशाचा अपुरा पुरवठा असल्याचे कारण देत ग्रामीण भागात भारनियमनाला सुरुवात केली . त्यातच जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे सिक्युरीटी डिपाॅझीटची स्वतंत्र बिले पाठवली आहेत . पुर्वीच हातात पुरेसा रोजगार नाही , अनेकांचे उद्योग मोडकळीस आलेले असताना , काहींनी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत असताना तुट भरून काढण्यासाठी महावितरण सिक्युरीटी डिपाॅझीटचा नवा फंडा काढला आहे . ही बीले नुकतीच शहरात महावितरणने पाठवली आहेत . दोन्हीही बीले एकाचवेळी आल्याने ही अतिरिक्त रक्कम ग्राहकांनी भरु नये असे आवाहन भाजपा च्या वतीने करण्यात येत आहे .
*महावितरणच्या सिक्युरीटी डिपाॅझीटच्या बिलाची भाजपा होळी करणार* ——-
एकीकडे लाईट बिल भरणे , लाईट बील वसुली यात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल असताना , तसेच वीजचोरीही सिंधुदुर्गात नसताना लोडशेडिंग करणे म्हणजेच सिंधुदुर्ग वासीयांवर अन्याय आहे. म्हणुनच या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा च्या वतीने डिपाॅझीट बिलांची होळी करणार असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .