जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत सांबरे यांचा अप्रतिम लेख
एका वाचन वेड्याचा प्रवास- भाग पहिला
#हेमंत सांबरे#
वाचनाची आवड हे खरे म्हणजे माझ्यासाठी बरेच काही आहे . हा प्रवास आहे व तो सुरूच आहे . कुठलाही प्रवास हा हवाहवासा वाटतो , त्यातल्या त्यात मला रेल्वेचा , बसचा प्रवास खूप आवडतो , तो कधी संपूच नये असे वाटते .आपल्या प्रवासाचा उद्देश हा ठिकाणापर्यंत ( Destination ) पोहोचणे हा असला तरी खरा आनंद प्रवासात असतो व तो जो मिळतो तो भारीच असतो . तसाच माझ्या वाचन-वेडाचा वा वाचन आवडीचा प्रवास शब्दबद्ध करावा असे सहज मनात आले .तसे हे लेखन ‘ *आत्म-सुखाय* ‘ असेच आहे .कारण हे लेखन पूर्ण झाल्यावर मलाच खूप आनंद होणार आहे व त्या रम्य , गूढ , अदभुत, रोमांचक आठवणी कागदावर उतरणे माझ्यासाठी एक श्रेष्ठ अनुभव असणार आहे .
वाचकहो , हा संवाद माझा स्वतःशी जास्त होणार असला तरी तुम्हालाही आवडेल असे मला वाटते . ज्यांना वाचनाची आवड आहे , असे वाचक माझ्याशी नक्कीच जोडले जातील.
आज तरी नक्की आठवत नाही की ‘वाचन करणे’ ही प्रक्रिया नक्की आयुष्यात कधी सुरू झाली .पण जीवनाला समृद्ध करणारी ही ‘ सवय ‘ वा ‘ आवड’ मला लागण्याचे १०० % श्रेय (Credit ) माझ्या प्रिय आईला जाते . आईला ही वाचनाची खूप आवड होती .तिनेच हे ‘बी’ माझ्यात पेरले . आणि पेरले नाही तर त्याला पाणी देणे , खत देणे , त्या छोट्या रोपाची जोपासना करणे हे ही सगळे आईनेच केले .
मी चौथीला गेल्यावर आम्ही झरेकाठी हे गाव सोडून आश्वि येथे राहायला आलो ( ता-संगमनेर , जिल्हा-अहमदनगर ) . येथे आल्यावर आमच्या घरी आईने चांदोबा , चंपक इ मासिके सुरू केली होती . येथे अजून एक चांगली गोष्ट सकारात्मक (Positive) झाली होती की आम्ही आश्विला जेथे राहत होतो तेथे समोरच पोष्ट ऑफिस ची बिल्डिंग होती , त्यामुळे येथेच अनेक पुस्तके , मासिके , दिवाळी अंक इ ची ओळख झाली . वाचनाची खरी आवड जर लावली असेल तर ती ‘ *चांदोबा ‘* या त्यावेळच्या खूप वाचकप्रिय मासिकानेच लावली असे आज तरी वाटते . कारण या मासिकात खूप सुंदर अशी चित्रे असत , त्यात अनेक सुंदर कथा , महाभारत-रामायण इ तील कथा असत .या मासिकातील चित्रांत जी घरे असायची ती खूप स्वच्छ व नीटनेटकी असायची , माणसे ही खूप साधी असायची . काळाच्या ओघात चांदोबा मासिक बंद पडले याचे मला आजही खूप वाईट वाटते .
आश्वित आम्ही राहायला आल्यावर तेथील ग्रामपंचायत च्या बिल्डिंग मध्ये लायब्ररी होती . त्याची फी परवडणारी असल्याने मी ती ही सुरू केली .या लायब्ररीत जाणे म्हणजे माझ्यासाठी एक आनंद-निधान होते .लायब्ररी कडे जात असताना एक वेगळीच आनंदाची लहर मनात येत असायची (जे अजूनही मला पक्के लक्षात आहे ) , ही लायब्ररी दुसऱ्या मजल्यावर होती , तिच्या पायऱ्या चढताना मनाला गुदगुल्या होत असत .खरं तर घरापासून हे पवित्र ठिकाण फारतर पाचशे मीटर वर असेल , पण शरीराच्या आधीच मन अलगद तिथे पोहोचलेले असायचे .मागच्या वेळी कोणती पुस्तकं मी बघितली होती , ती आता असतील की दुसऱ्या कुणी नेली असतील , याबद्दल मनात विचार सुरू असायचे . या ठिकाणचा हेडमास्तर ( म्हणजेच लायब्ररीयन ) खूप कडक होता .तिथे किती वेळ थांबायचे , किती पुस्तके बघायची याचे नियम कडक होते .त्यामुळे आम्ही वाचकांनी ‘ कसे वाचावे ‘ यापेक्षा ‘ कसे वाचू नये ‘ याकडेच त्यांचे लक्ष असायचे (पुढे जाऊन माझी यांच्याशी चांगली मैत्री झाली , व मला येथे मुक्त-प्रवेश व वाट्टेल तितका वेळ पुस्तकं बघण्याची मुभा मिळाली ही गोष्ट अलाहिदा !) . या आश्विच्या लायब्ररीत त्यावेळी किमान पाच हजार पेक्षा जास्तच पुस्तके होती . तेव्हा जे पुस्तक हातात मिळेल ते हावरटा सारखे वाचून काढायचो (हो 😂, हावरट हाच शब्द योग्य ) …तेव्हा तर (माझे वय वर्ष १०-१२ वगैरे ) शील -अश्लील , हिंसक-अहिंसक , सेक्स -असेक्स(हा माझाच शब्द समजा ☺️) काही म्हणजे काही समजत नव्हते .पुस्तकातील नायकाने नायिकेचे कसे चुंबन (Kiss) घेतले याची तपशीलवार वर्णने , त्यातल्या त्यात रहस्य-कथा वगैरे असलेल्या पुस्तकात असायची व तेव्हा किती कळत होते पण माहिती नाही पण ते ही अगदी ओळन-ओळ वाचलेले असायचे .पुस्तक मिळाले की वाचायचे हाच एककलमी कार्यक्रम वा एकमेव फंडा होता . पण आज विचार केला तर कळते की चांगले-वाईट असे वेगळे कसे करायचे , काय घ्यायचे , काय सोडायचे हे ही ‘ वाचन’ च आपल्याला शिकवत असते !
या आश्विच्या लायब्ररीची एक आठवण अशीही आहे , तेव्हा ‘श्रीमान योगी ‘ , ‘ स्वामी’ , ‘ छावा ‘ इ पुस्तकं कायम कुणातरी वाचकाकडे फिरत असायची व मला ती कधीही वाचायला मिळत नसायची (विकत घेऊन वाचणे हा concept तोपर्यंत नव्हता आला व शक्य ही नव्हते ) त्यामुळे मी अगदी ते पुस्तक कुणी नेले याची माहिती काढायचो व त्या व्यक्तीच्या घरी जाऊन ‘ बाबा रे , ते पुस्तक लवकर वाच आणि लायब्ररीत लवकर परत दे ‘ असे सांगण्याचे ही सोडले नाही (😂😂) .काही दयाळू वाचक वा मित्रांनी परस्पर ते पुस्तक मला देऊ केले व मग मी ते वाचून त्यांनाच परत दिले असेही मला आठवते .अशी ही आम्ही बाहेरच्या बाहेर सेटींग करायचो. मी हा ही अनुभव घेतला आहे की बरेच वाचक लायब्ररीला पुस्तक परत द्यायचेच नाही , त्यामुळे अनेक दुर्मिळ पुस्तके कायमची गायब व्हायची , याचे मला व लायब्ररीमन असे दोघांनीही सारखेच वाईट वाटायचे.
एकदा पुस्तक हातात आले की माझी वाचण्याची ठिकाणे व त्याबद्दल च्या आठवणी ही खूप रंजक आहेत . माझे वाचण्याचे मुख्य ठिकाण असायचे आमच्या समोर असलेल्या पोस्टाच्या बिल्डिंगच्या पायऱ्या …खाली पोस्ट ऑफिस व वर पोस्ट मास्तर राहायचे , त्याच्या मधल्या पायऱ्या वर निवांत बसावे व तासनतास माझी वाचन-समाधी लागावी असे खूपदा व्हायचे . या पायऱ्यांवर माझा उजवा हात पायरीवर टेकवलेला , डाव्या हातात पुस्तक (किंवा याउलट ) या अवस्थेत एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखा मी तासनतास बसून वाचत असायचो . पोस्टाच्या गच्चीवर ही मी बसायचो .तेथे दिवसभर ऊन जसे वाढेल तसे सावलीची जागा बघून जागा बदलत राहावी लागायची . दुसरे ठिकाण आमच्या मारुती मंदिराच्या गाभाऱ्याची मागची बाजू (प्रदक्षिणा करताना मागची बाजू ) म्हणजे अगदी मारुतीरायाच्या पाठीला पाठ लावून मी बसायचो ! हे ठिकाण ही खूप एकांत असलेले होते (निदान दिवसभर तरी! ) , अजून तिसरे ठिकाण म्हणजे आश्विच्या नदीकाठी असलेले महादेव मंदिर ! येथे त्यावेळी मंदिराच्या मागच्या बाजूला एक चिंचेचे मोठे झाड होते , त्याखाली ही खूप छान वाचन व्हायचे . हे असे ‘ वाचन ‘ करणे म्हणजे स्वतःला , आजूबाजूच्या परिस्थितीला ‘विसरणे ‘म्हणजे काय याचा मी शब्दशः अनुभव घेतला आहे . त्यावेळच्या पुस्तकामध्ये ‘ परकाया प्रवेश ‘ असा एक प्रकार गूढकथा इ मध्ये वर्णन केलेले असायचा , तसेच काहीसा ‘पुस्तकांचा माझ्यामध्ये झालेला परकाया प्रवेश’ किंवा ते अध्यात्म मध्ये ‘ योग-समाधी ‘ असते ते ही यापेक्षा काही वेगळे असेल असे मला तरी वाटत नाही .
घरात बसून तेव्हा प्लास्टिक ची खुर्ची तिरकी करून , भिंतीवर टेकवून वाचणे ही ही एक वाचण्याची position असायची .बसमध्ये प्रवास करताना पुस्तक वाचत जाणे हे ही खूप आवडायचे , त्या अर्थाने बस ठिकाणावर पोहोचली की खूप वाईट वाटायचे .
बहुतेकांना वाचनाची आवड लागते व ती नंतर टिकून राहते ती रहस्यकथा व भयकथा या प्रकारांमुळे ! माझेही त्या काळातील वाचन आडम-धडम (खास आमचा नगरी शब्द!) असल्याने मी ही खूप हा प्रकार वाचला आहे . पण हा प्रकार मुळात मलाही खूप आवडतो .कारण मनोरंजन हाच वाचनाचा वा कुठल्याही छंदाचा मुख्य हेतु असतो . या रांगेत खूप आधी बाबुराव अर्नाळकर आले ! त्यांची पुस्तकं आश्विच्या वाचनालयात खूप संख्येने होती व मी ती बहुतेक वाचली . काळापहाड (उर्फ चंद्रवदन), झुंजार , धनंजय-छोटू इ सारखी अनेक पात्रे व त्यांचे नायक खूप लोकप्रिय ! मला अजूनही ते ” झुंजारने अचानक ठोसा कसा मारला व त्याला लोळविले किंवा काळापहाडच्या हातात अचानक पिस्तुल आले ‘ अशा प्रकारची वाक्ये आठवतात . विशेष म्हणजे माझे आदर्श असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हेच बाबुराव यांचे ही आदर्श होते . सावरकरांच्या सांगण्यावरून ते सैन्यात ही सामील झाले होते . या रहस्यकथा इतक्या उत्कंठा वाढविणाऱ्या असत ती पूर्ण वाचून होईपर्यंत माझी झोप उडालेली असे ! पुढे गुरुनाथ नाईक , नारायण धारप (भयकथा ) इ लेखक ही खूप वाचले . भुते , प्रेतं , चेटकीण , पुरातन वाडे , मिती-त्रिमिती यावरचे लेखन म्हणजे धारप यांचा विशेष हातखंडा होता .त्यांची पुस्तक वाचून खरोखर भीती वाटायची व अंधार दिसला की त्यांच्या पुस्तकातील प्रसंग आठवत . या लेखकाने त्या विशिष्ट काळात मनावर विलक्षण गारुड केलेले होते. भीती ही भावना प्रत्यक्षात नकोशी असली तरी धारप यांची पुस्तकं वाचताना वाटणारी ” भीती ” हवीशी वाटायची व परत परत तो अनुभव घ्यावा असेच वाटायचे . मध्यमवर्गीय वा स्वतःला स्टेटस वगैरे असणारे लोक प्रत्यक्षात अर्नाळकर , धारप , गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर यासारख्या लेखकांना फारसे मानत नाही असे दाखवतात ,पण मला वाटते ते सुद्धा त्यांच्या कथा , कादंबऱ्या चोरून वाचत असावेत😂😂 ( रोमान्स , अंगावर शहारे आणणारे भय , रहस्य हे प्रत्येकाला हवेसे असतेच ! ) . अलिकडेच गाजलेला ” तूंबाड” चित्रपट हा धारप यांच्याच कथेवर आधारलेला होता असे म्हणतात. .
आपल्या रोजच्या आयुष्यात खरे तर जे कधीच घडत नाही वा घडू शकत नाही ते या रहस्यकथा-भयकथा मध्ये इतक्या रोमांचक पद्धतीने घडते की , ते वाचताना खूप मज्जा येते व निरस-कंटाळवाणे आयुष्य रंगीबेरंगी होऊन जाते.
गुरुनाथ नाईक हे अजून एक मोठे लेखक ! त्यांनी अर्नाळकर यांच्या इतक्याच कादंबऱ्या वा रहस्यकथा लिहल्या ! खरे तर मराठी चित्रपटांना कथांची व विषयांची कमतरता पडायलाच नको , इतके या त्रयीने (अर्नाळकर-नारायण धारप-गुरुनाथ नाईक ) लिहून ठेवले आहे . माझ्या त्या वेळच्या विचार-विश्वावर या तीन लेखकांचा खूपच प्रभाव होता .
शेरलॉक होम्स ( लेखक-आर्थर कॉनन डॉयल ) तसा मी खूप उशिरा (म्हणजे ११ वीला )वाचला , पण त्याआधी या लेखक त्रयीने रहस्य कथा , गूढकथा , भयकथांचे वेड लावलेच होते .
मराठीत पुरस्कार वगैरेंनी या लेखकांची उपेक्षा जरी केली तरी माझ्यासारख्या असंख्य मराठी वाचकांचे हे अतिशय ( All Time Favorite ) आवडते लेखक आहेत .
पुढे सातवीत असताना माझ्या वाचन-आयुष्यात टर्निंग पॉईंट आला तो ” माझी जन्मठेप ” या स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित आत्मचरित्ररुपी पुस्तकाने ! कारण या पुस्तकाने आयुष्याला एक नवेच वळण मिळाले ! अनेक हालअपेष्टा , कष्ट , दुःख , उपेक्षा, अपमान इ मिळूनही सावरकरांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा सकारात्मक ( Positive ) असायचा हे वाचून माझे जीवन तरी आमूलाग्र बदलून गेले . खरं तर सातवीत सावरकरांची भाषा मला खूप जड वाटली होती व फारशी पचलीही नव्हती , पण त्यातल्या भावना मात्र मनावर पक्केपणाने कोरल्या गेल्या होत्या व त्या अजूनही तितक्याच पक्क्या आहेत . माझी जन्मठेप मी त्यानंतर आत्तापर्यंत १८ ते २० वेळा वाचले आहे . या पुस्तकाने माझ्यासारखेच अनेक वाचकांना प्रेरणा दिली असेल (हे नक्की ! ) पण माझ्यासाठी हे पुस्तक खूप अनमोल असा ठेवा आहे . ( ज्या वाचकांनी अजूनही हे पुस्तक वाचले नसेल तर नक्की वाचा , तुमचेही जीवन बदलून जाईल हे नक्की ! ) .
श्यामची आई हे पुस्तक ही मी त्याच दरम्यान कधीतरी वाचले असावे . या पुस्तकाची ही खूप पारायणे नंतर केली . हे ही माझे आजही एक आवडते पुस्तक आहे .
पुढे जाऊन श्रीमान योगी , स्वामी , झुंज , शहेनशहा इ अनेक ऐतिहासिक पुस्तके-कादंबऱ्या वाचल्या .त्यात श्रीमान योगी मला विशेष आवडली . ह ना आपटे हे ही मुख्य आवडते लेखक ! त्यांची ,’ मी ‘ , ‘ यशवंतराव’ , ‘ पण लक्षात कोण घेतो ‘ , ‘ गड आला पण सिंह गेला ‘ ही पुस्तके तेव्हा वाचली . त्यांची अतिशय विस्तृतपणे ( Detailing ) वर्णनं करण्याची शैली भारीच होती . विशेषतः ऐतिहासिक कथा रंगविताना ह ना आपटे त्याला रहस्याच्या पद्धतीने उलगडत न्यायचे . अनेक पात्रांची सरमिसळ करायचे , त्यांचे प्रसंग ही वेगवेगळे करून मग त्या सर्व पात्रांना-प्रसंगांना मग पुढे कादंबरीत अतिशय खुबीने एकमेकांशी जोडायचे. ते खूप रोमहर्षक वाटायचे . व ही पात्रे वा प्रसंग , घटना इ जोडताना दिलेले संदर्भ (References ) इतके बिनचूक असत की आपल्याला ह ना आपटे यांच्या बुद्धी व चातुर्याचे कौतुक वाटत राहते . गो नी दांडेकर , बाबासाहेब पुरंदरे इ लेखकांची ही खूप पुस्तके वाचली होती . तेव्हा तरी माहिती घेणे वा अभ्यास करणे असला काही हेतू नव्हता त्यामुळे वाचनाचा छंद जोपासणे व मनाचा आनंद घेणे हेच होते .
याच काळात केव्हातरी श्री ना पेंडसें यांचे गारंबीचा बाप्पू हे पुस्तक वाचले . खूप आवडले होते तेव्हा ! विशेषतः पहिल्यांदा कोकणातील निसर्ग , तेथली माणसं इ ची ओळख झाली . खूप खूप भावली होती ती माणसं , निसर्ग ! अलीकडे २०२० साली गारंबीचा बाप्पू परत वाचले , त्या बरोबरीने ‘ तूंबाडचे खोत ‘ ही महाकादंबरी ही नेटाने वाचली . या कादंबरीत एक पात्र संताजी हा वीर सावरकरांचा भक्त आहे असे दाखवले आहे व पानोपानी सावरकरांचे विचार मांडले हे बघून सुखद अनुभव मिळाला .
आनंद यादव यांचे झोंबी ही खूप आवडले होते .त्यात त्यांची शिक्षण घेण्यासाठीची धडपड बघून आपण खरे तर किती सुखी आहोत याची जाणीव झाली होती .त्यानंतर त्यांचीच काचवेल , नांगरणी ही ही वाचली पण झोंबी इतकी ती नाही आवडली .
हेच सगळे सुरू असताना आमची गाडी दहावीला पोहोचली .तेव्हा (कदाचित आजही आहे ! ) दहावीचे वर्ष म्हणजे खूप महत्त्वाचे समजले जायचे , त्यामुळे आमच्या घरात ही तसे सिरिअस वातावरण तयार झाले . आजूबाजूला ही’ खूप अभ्यास करावा लागतो ‘ अशी कुजबुज सुरू झाली होती . त्यातच माझी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर ‘ या विषयावर अभ्यास करण्याची इच्छा अजून मोठी झाली होती . बहुधा म्हणूनच आईने मला शब्द दिला की जर मी दहावीला केंद्रात पहिला नंबर ( त्यावेळी केंद्र म्हणजे १९ शाळांचे मिळून असे आश्वि येथे होते ) मिळवला तर मला सावरकर समग्र खंड विकत घेऊन देईल . मग तर आम्ही झपाटून अभ्यासाला लागलो , व खरोखरच केंद्रात माझा प्रथम क्रमांक आला ( १९९७ साली ). हा पहिला क्रमांक आला याच्या आनंदापेक्षा मला समग्र सावरकर वाचायला मिळतील याचा मला खूप आनंद झाला . मग १९९७ साली आमच्याकडे हे सावरकर लिखित ९ च्या ९ खंड आले व त्यांनतर पुढच्या वर्षभरात मी ते वाचून ही काढले होते .
दहावीच्या सुट्टीतील विशेष आठवण आहे . तेव्हा कुठूनतरी मला ‘ तुकाराम गाथा ‘ मिळाली व ती मी पूर्ण वाचली . ते अभंग वाचून मला कविता रचण्याची खरी प्रेरणा मिळाली व मी खऱ्या अर्थाने कविता करणे सुरू केले . याच काळात ‘ दासबोध ‘ ही निम्मा वाचल्याचे आठवते . लिखाण सुरू केल्यावर सुरुवातीला नक्कल करणे वा अनुकरण करने साहजिक असते , मी ही तसेच केले व खालील अभंगासारखी कविता रचली , जी त्यावेळी माझ्या अनेक मित्र , शिक्षक इ ना ही खूप आवडली होती , ती कविता अशी होती 👇👇
वाचन माझी भूक, वाचन माझे सुख
वाचनाने दुःख , गेले पळोनि !
वाचन जीवन , वाचनी मरण
वाचनावीण मी , राहू कसा ?
वाचन भजन, वाचन कीर्तन
वाचन चिंतन , जगदिशाचे !
ब्रह्मानंद आहे , वाचनात माझा
स्वर्गीचेही सुख , फिके वाटे !
अमृताचे सार , वाचनाची धार
पडो मुखी माझ्या , नित्यदिनी !
पाण्याविना मासा , बाळावीन आई
वाचनावीण तसा , राहू कसा ?
या वाचनाने जपले, एक तन, एक मन
केले खरंच सधन, याने मला !
(अर्थात या कवितेत मी केलेली नक्कल वा Copy/Paste असलेले शब्द वाचकांना स्पष्ट दिसतील ) .
वाचन करताना selective असे कधीच नव्हते , जे हातात मिळेल ते अधाशीपणे वाचून काढायचो , त्यामुळे निदान २० वर्षांचा होईपर्यंत असेच होते .पुढे पुढे जाऊन कादंबऱ्या वाचताना ओळ न ओळ न वाचता फक्त महत्वाचे असे ओळखून नजरेने scan करत पुस्तक speed ने कसे वाचावे हे ही शिकलो , त्यामुळे माझा वाचनाचा वेग अजून वाढला .
वाचनाने अनेक फायदे होतात , माझ्याआधी ही अनेकांनी सांगितली आहेतच पण *माझ्यासाठी* काय झाले ते ही सांगतो ते असे ,
१.वाचनाने एक Positive Attitude निर्माण होतो .
२.आयुष्यात कधीही एकटे वाटत नाही.
३.कोणत्याही संकटकाळी कसे वागावे व शांत कसे राहावे हे आपोआपच कळू लागते .
४.पुस्तकांच्या रूपाने एक कायमचा मित्र आयुष्यात जोडलेला राहतो ; जो कधीही आपणास सोडून जात नाही .
५.रागावर नियंत्रण आपोआपच राहते , कारण वाचन आपल्या विचारांना योग्य दिशा दाखवत राहते.
६.विचारांचा व ध्येयाचा अचूक मार्ग सतत दिसत राहतो. .
अजूनही बरेच काही जे कदाचित मला शब्दांत मांडता येणार ही नाही !
तर वाचकहो ! असेच वाचत राहु,असेच समृद्ध होत राहु ! 👍
खूप खूप धन्यवाद !
© हेमंत सांबरे
Contact -9922992370 .