You are currently viewing डाॅक्टर डाॅक्टर

डाॅक्टर डाॅक्टर

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम कथा

डाॅक्टर डाॅक्टर

*वेळा* नदीच्या काठावरचं नेवरी हे गाव.नैसर्गिक नदीकिनार्‍यामुळे हरितसंपन्नता आपसूकच वाढलेली.सह्याद्रीच्या पर्वतरांगांधील संपन्न गावांमध्ये नेवरीचा समावेश होत असे. तालुक्यासारखीच वर्दळ, शाळा,दवाखाने, मंगल कार्यालये, मेडिकल आणि इतर उपलब्धता या गावात होती.
डाॅ. आनंद भोसे यांचं घर नदीच्या काठाच्या अगदी जवळच होतं. तसे ते तालुक्याच्या हाॅस्पिटलमध्ये सरकारी नोकर होते आणि घरातच त्यांनी एक गावातलं पहिलंवहिलं प्रसूतीगृह सुरू केलं होतं. त्यांची बायको छाया ही देखील जवळच असलेल्या लिंबेगावच्या सरकारी रूग्णालयात हेड नर्स म्हणून काम करीत होती.शाळेत जाणारी एक मुलगी, एक मुलगा आणि डाॅक्टरांची म्हातारी आई घरातली व्यवस्था पाहत असत. छाया ही दिसायला फार सुंदर आणि आकर्षक. पण या रूपाचा तिला फारच गर्व. बोलभांड आणि कजाग अशा स्वभावामुळे सारा गाव तिला वचकून असायचा. एरवी गावात, हाॅस्पिटल आणि मित्रमंडळींमध्ये फुशारक्या मारणारे डाॅक्टर तिच्या समोर मात्र चळचळ कापत. रागाच्या भरात वाट्टेल ते ती बोलायची. सासू, मुले, नवरा, नातेवाईक कुणाचीही भीडभाड ठेवीत नसे.
ओळखणारी मंडळी आणि नातेवाईकांमध्ये ‘बायकोचा गुलाम’ अशी कुजबूज व्हायची पण डाॅक्टर तिकडे कानाडोळा करायचे. या सगळ्या वातावरणाचा परिणाम असेल कदाचित पण डाॅक्टरांचा स्वभाव थोडासा स्त्रीलंपट झाला होता. पेशंट म्हणून येणार्‍या स्त्रियांशी ते जरा अघळपघळच गप्पा मारायचे.छायाच्या लक्षात येताच मात्र आतषबाजी व्हायची. पण भांडणाचा शेवट हा नेहमीच डाॅक्टरांच्या माफी मागण्याने आणि छायाची मनधरणी करण्याने व्हायचा.
एके दिवशी डाॅक्टरांना कामावर असताना सरकारी पत्र मिळाले. त्यांना पदोन्नती मिळाली होती. आता रूग्णालय प्रमुख म्हणून पदभार स्विकारण्यासाठी दूरवर असलेल्या बारजे या गावातल्या रूग्णालयात त्यांची बदली झाली होती.आनंद आणि संकटं नेहमी हातात हात घालूनच एकत्र येतात. कारण त्यांच्या राहत्या गावापासून बदलीच्या गावी जाण्या येण्याचा प्रवास सहजशक्य असा नव्हता. गाडी -रस्ता असं काहीच सोयीचं नव्हतं. त्यामुळे त्यांना तिथेच कामाच्या गावी राहणं भाग होतं. नाईलाजाने त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांना सोडण्यासाठी म्हणून छाया आणि मुले बारजेला आली होती. निवासी अधिकारी म्हणून त्यांच्या रहाण्याची व्यवस्था ग्रामीण क्षेत्र असले तरी छानच होती. जवळच एका घरी जेवणाची व्यवस्थाही झाली. क्वार्टर्समध्ये स्वच्छता आणि देखभालीसाठी दोन शिपाई सुद्धा होते. एकंदर सगळं ठीक आहे, हे पाहून दुसर्‍या दिवशी छाया आणि मुलांनी निरोप घेतला.
दोन-तीन दिवसातच एक शिपाई त्याच्या गावी प्राॅपर्टीचं कसलंसं काम निघाल्यामुळे दीर्घकालीन रजेवर निघून गेला. त्याच्या जागेवर शेजारच्याच गावातली वैजयंता साळुंखे नावाची एक महिला शिपाई बदली म्हणून आली.ती विधवा होती. साधारण चाळीस बेचाळीस वयाची,सावळ्या वर्णाची, मुसमुसलेल्या यौवनाची, आकर्षक बांध्याची अशी ती होती. “आजपासून मी बदली म्हणून आलीया साहेब! काय बी काम असलं तर मला सांगा” असं ती डाॅक्टरांना म्हणाली.”बरं! बरं!” असं म्हणून डाॅक्टर आपल्या कामाकडे वळले पण त्यांच्या नजरेसमोरून तिचा आकर्षकपणा, मादक आणि आर्जवी लाडिकपणा, काही केल्या जाईना.
केरवारे, साफसफाई करायला आता वैजू रोजच सकाळी डाॅक्टरांच्या घरी येई. डाॅक्टरांचेही काहीतरी काम चालू असायचे, पण हळूच चोरून ते तिला न्याहाळायचे.तिच्या ढळणार्‍या आणि सावरणार्‍या पदराकडे बुभुक्षित नजरेने पाहताना वैजूनंही त्यांना हेरलं होतं.तिने तिच्याही नकळत डाॅक्टरांना प्रतिसाद दिला होता. आता तिचं डाॅक्टरांच्या घरात रेंगाळणं वाढू लागलं होतं.दोघांचीही शारीरिक गरज एकमेकांना परस्परांकडे ओढू लागली.आणि अचानक एके दिवशी घडाळ्यातल्या बारा वाजता दोन काटे जसे एक होतात तसे ते दोघेही एक झाले. दोन उपाशी जीव आज तृप्त झाले होते. आता अधूनमधून हे घडतंच होतं. गावात अशा गोष्टी काही लपून राहत नाहीत. जाण्यायेण्याच्या बदललेल्या वेळा आणि चेहर्‍यावरचे बदललेले हावभाव हे गावातल्या चर्चेसाठी पुरेसे असतात. पण डाॅक्टरांची प्रतिष्ठा आणि लोकांना डाॅक्टरांची असलेली गरज म्हणून ‘आपल्याला काय करायचंय!’ म्हणून थेट कुणीही बोलत नसे.
दर आठवड्याला डाॅक्टर नेवरीला आपल्या घरी येत असत. पण त्यांना परत बारजेला जाण्याचीच ओढ असे. छायाने आग्रह करूनही थातुरमातूर कारणं सांगून ते थांबायला तयार नसत.तिकडे वैजूलाही दोन दिवसांचा विरह देखील सहन होत नव्हता.ती डाॅक्टरांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची.
“दिवाळीच्या आधी आणि नंतर चार दिवस अशी दोन आठवड्यांची रजा टाका.कोणतीही सबब सांगू नका. समजलं ना!” छायाने ठणकावलं. छायापुढे बोलण्याची त्यांची काहीच हिंमत नव्हती त्यामुळे मुकाट्याने त्यांनी रजा मंजूर करून घेतली.”पंधरा दिस कसं काढायचं तुमच्याबिगर?” वैजू कातावली होती. डाॅक्टरांनाही तिच्याशिवाय करमणार नव्हतंच. डाॅक्टर म्हणाले,” तू पण चल माझ्याबरोबर.” ” अवं पण तुमची घरवाली…?”ती म्हणाली “मी घेईन सांभाळून. तू नको काळजी करू. फक्त मी सांगतो तसं वाग.तिथं गेल्यावर छायाच्या पुढे पुढे करायचं. माझ्याशी कामापुरतंच बोलायचं. जमेल ना?” “व्हय जमेल की” वैजू मनातून हरखली होती.
ते दोघे दिवाळीच्या चार दिवस अगोदर नेवरीला येऊन पोहोचले. तसे ‘मी येताना तुझ्या मदतीसाठी आमची एक गरीब विधवा शिपाई आहे, तिला घेऊन येतोय, चालेल ना?’ अशी रीतसर परवानगी डाॅक्टरांनी घेतलीच होती. साशंकपणाने ‘पाहूया तरी कोण आहे?’ असा विचार करून छायानेही परवानगी दिलेली होती. घरात पाऊल टाकताच डाॅक्टर आपल्या कामाकडे वळले आणि वैजू स्वयंपाकघराकडे. ताई ताई म्हणून थोड्याच वेळात छायाला तिने आपलंसं करून घेतलं. छायालाही हक्काची आणि फुकटात राबणारी मोलकरीण मिळाली होती त्यामुळे ती ही खूश होती.येता जाता एकमेकांना नुसतं पाहूनच, ओझरत्या स्पर्शानेच डाॅक्टर आणि वैजू सुखावत होते.
दिवाळी आली! वैजूने केलेला सगळा फराळ सर्वांनीच आवडीने आणि कौतुक करत करत फस्त केला. मुंबईहून छायाची बहीण उषा दिवाळीच्या निमित्ताने आली. वैजूचा घरातला मुक्त वावर पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. छायाने तिची सगळी परिस्थिती सांगितली पण उषाचं मन मात्र विश्वास ठेवायला तयार नव्हतं.छायाचा आततायीपणा देखील तिला माहित होता त्यामुळे खात्री पटल्याशिवाय काही बोलायला नको, असे तिने ठरवले. एकत्र जेवताना डाॅक्टर आणि वैजूच्या चाललेल्या खाणाखुणा इतर कुणाला कळत नव्हत्या पण उषाच्या नजरेतून मात्र त्या सुटल्या नाहीत.
जेवणं झाल्यावर शांतपणे तिने छायाकडे विषय काढला.”ताई वैजू आणि भावोजींवर जरा लक्ष ठेव हं! मला काहीतरी वेगळंच दिसतंय!” असं म्हणताच छायाचा पारा चढला. ती म्हणाली “मला सुख आणि आराम मिळतोय, हे तुला पाहवत नाही. अगं, माझ्यासारखी सुंदर बायको असताना माझा नवरा असं कुणाकडे कशाला जाईल. डाॅक्टर म्हणून नावलौकिक आहे त्याचा, तो शेण खाईल असं का वाटतं तुला? तू माझ्यावर जळतेस म्हणून असं बोलतेस” उषालाही खूप राग आला आणि ती म्हणाली “तुझ्या या आक्रस्ताळेपणामुळेच तुझ्यावर ही वेळ आली आहे. तू आणि तुझा सुखाचा संसार तुला लखलाभ!” असं म्हणून ती मुंबईला निघण्याची तयारी करू लागली.
रात्री डाॅक्टर आणि छाया त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. मुलं आणि उषा मुलांच्या खोलीत. डाॅक्टरांची आई आणि वैजू गच्चीवर. पहाटे पाचच्या सुमारास डाॅक्टर खोलीतून बाहेर पडले. छायाचीही झोप चाळवली. तिला वाटले एक नंबरसाठी गेले असतील. ती अर्धवट झोपेत होती. पहाटेच्या वेळी थंडीमुळे डाॅक्टरांची आई खाली स्वयंपाकघरात चुलीजवळच येऊन निजली. गच्चीवर आता वैजू एकटीच होती.ती जागी होती वाट बघत.तेवढ्यात रात्रीच्या खाणाखुणांनी ठरल्याप्रमाणे दबकत दबकत डाॅक्टर तिथे आले आणि वैजूच्या गोधडीतच शिरले.”अजिबातच लक्ष नसतं वो तुमचं हल्ली” वैजू पुटपुटली. “अगं घरात सगळे असताना काहीच शक्य नाही.बारजेला गेल्यावर मी तुझा राजा आणि तू माझी राणी, कसं!” डाॅक्टर म्हणाले. “आता छायाताईंना कळलं तर?” वैजू म्हणाली. “मग मी घाबरतो की काय तिला?” असं म्हणून डाॅक्टरांनी वैजूला मिठी मारली आणि गोधडी चुरगाळली.
अजून कसे आले नाहीत, असा विचार येताच छाया लगबगीनं उठली. रात्री उषा म्हणाली त्याप्रमाणे संशायाचा किडा आता छायाच्या मनात वळवळू लागला. ती तडक गच्चीवर पोहचली.आणि….. आणि…. तिने त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहताच तिचा पारा चढला, तोल सुटला. बाजूला पडलेल्या धोपाटण्याने तिने दोघांनाही मारायला सुरूवात केली. एकीकडे तोंडाने शिव्या सुरू होत्या “सटवी, बाजारबसवी ,अवदसा माझ्या नवर्‍याला नादावतेस? आज तुला सोडतच नाही मी. आणि तू रे डुकरा, एवढी रूपवान अप्सरेसारखी बायको असताना शेण खायला गेलास ना?. तुझी लायकी चपलेचा मार खायचीच आहे रे” हळूहळू उजाडत होतं. बघता बघता सारं गाव गोळा झालं. छायाचा हात आणि तोंडाचा पट्टा सुरूच होता. कसेबसे अंगावरले कपडे आवरून डाॅक्टर आणि वैजू मार खाता खाता गयावया करत होते. “मी चुकलो, मला माफ कर, पुन्हा असं घडणार नाही, पाया पडतो तुझ्या” अशा विनवण्या डाॅक्टर करत होते. लोकंही फक्त तमाशा बघत होती. छायापुढे बोलण्याची गावात कुणाचीही हिंमत नव्हती. डाॅक्टर मार खाऊन खाऊन बेजार झाले होते.कपडे फाटले होते. हात, पाय, डोकं फुटलं होतं. वैजूच्या झिंज्या पार उपटल्या गेल्या होत्या, कपड्यांच्या चिंधड्या झाल्या होत्या. कसंबसं आपलं गाठोडं घेऊन ती तिथून जायला निघाली. त्राटिकेच्या अवताराने छाया देखील दमली होती. जाता जाता अचानक वैजू पाठमोरी वळली अन कडाडली “तुझ्या या आक्रस्ताळेपणामुळेच तुझा नवरा तुझा राहिला नाय.त्याला तुझ्याविषयी प्रेम नाय तर धाक वाटतो, हे तुझंच अपेश हाय. इच्चार सोत्ताच्या मनाला!” आणि मानेला हिसडा देऊन रडतच ती निघून गेली.
कळवळणार्‍या आणि कण्हणार्‍या अर्धमेल्या आपल्या नवर्‍याकडे पाहून, वैजूने जाताना काढलेले उद्गार तिला पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले.

—हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा