कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडल्यानंतर ‘साकव्य’ अर्थात साहित्य, कला व व्यक्ती विकास समूहाचा पहिला-वहिला छोटेखानी ऑफलाईन काव्य-कट्टा शुक्रवार दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाला. निमित्त होते, ‘साकव्य’ समूहाचे सक्रिय सदस्य मा. श्री. अनिल देशपांडे, कोलकाता यांची नाशिक भेट व त्या दरम्यान साकव्य सुहृदांना भेटण्याची व संवाद साधण्याची त्यांची इच्छा.
स्थळ, काळ, वेळ आणि मित्र कंपनी सगळे समीकरण जुळून आले आणि आज सायंकाळी पाच वाजता गोविंद नगर गणपती मंदिर, नाशिक येथे भेटायचे असे ठरले. त्यायोगेच जणू बाप्पाचा आशीर्वादही या कोरोना-उपरांतच्या पहिल्या प्रत्यक्ष काव्य-कट्ट्यास लाभणार होता.
कुणी आधी, कुणी नंतर असे करत-करत मा. श्री. पांडुरंग कुलकर्णी सर, विश्वास रेडियोचे श्री. हरिभाऊ कुलकर्णी, अलका कुलकर्णी, अनिल देशपांडे, अतुल देशपांडे, प्रियंका सरोदे, माणिक शुरजोशी, राखी जोशी, मिलिंद पगारे व किरण सोनार हे साकव्य सदस्य उपस्थित झालेत.
आधी प्राथमिक गप्पा, ‘साकव्य’ च्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा, मतांची देवाण-घेवाण असा प्रवास करत गप्पांची मैफल काव्य सादरीकरणाकडे वळली. सर्वप्रथम अनिल जी यांनी वृत्तबद्ध कवितेपासून सुरुवात करून ‘माहेर’ या विषयावर सुंदर काव्य सादर केले. त्यानंतर प्रियंका सरोदे यांनी सादर केलेली गझल मना-मनाला चटकन जाऊन भिडली. माणिक शूरजोशी यांची भक्तिमय कविता आणि मंदिराचा परिसर यांचा असा काही उत्तम परिणाम साधला गेला की आपसूकच प्रत्येकाच्या मुखातून ‘वाह’ असे शब्द आपोआपच बाहेर पडले. वेळ संध्याकाळची असली तरी सखीच्या गालावरच्या खळीतच चंद्रकोर पाहणारे कवी अतुल देशपांडे आपल्या शृंगार-काव्य सादरीकरणाने सर्वांची वाहवा मिळवून गेले. भर उन्हाळ्यात मखमली, भरजरी शब्दातून अलका ताईंच्या मुखातून जेव्हा पाऊस गाऊ लागला तेव्हा सगळेच त्यात चिंब भिजले असे म्हणायला हरकत नाही. कविमनाला काव्य स्त्रोत कुठून मिळतात हे राखी जोशी यांच्या रचनेतून उद्धृत झाले. गद्य-पद्यात अडकलेले कवी मनाचे जीवन मांडणारे अनिल जी, अतिवृष्टी च्या पावसाचे हृदयद्रावक वर्णन अन् तक्रार करणारे अतुल जी, ‘माझ्या नातीची कविता साऱ्या आजोबांची व्हावी’ म्हणत खास ‘वाहवा’ घेणारे पांडुरंग कुलकर्णी सर, गेय काव्यातून सुंदर काव्य सादर करणाऱ्या प्रियंका सरोदे, ‘तुझी सोबत’ सुंदर शब्दात मांडणाऱ्या माणिक ताई, ‘लय भारी’ प्रेम कविता सादर करणारे किरण सोनार, गझल, वृत्तबद्ध कविता, गेय कविता अशा सगळ्यात प्रकारात सहज विहार करत ठसा उमटविणाऱ्या अलका ताई, कवीच्या लेखी कागद काय असतो हे सांगणाऱ्या राखी जोशी आणि सगळ्यांना दिलखुलास दाद देणारे हरिभाऊ कुलकर्णी कुणा-कुणाचे अन् किती-किती कौतुक करावे!
शेवटी पांडुरंग कुलकर्णी सर यांच्या खास फर्माईशीवरून ‘तो आणि संध्याकाळ’ ही मुक्तछंदातली कविता राखी जोशी यांनी सादर केली व मैफलीची सांगता झाली. उत्तरोत्तर रंगत गेलेली ही मैफल पुढचे अनेक दिवस आमच्या सर्वांच्याच मनात दरवळत राहील यात शंका नाही.
ऑनलाईन काव्य संमेलन कितीही रंगले तरी मोबाईल नामक डब्ब्यात छोट्या-छोट्या चौकोनात भेटणारी दिसणारी माणसं, कविता सादर केल्यावर साधारण अर्ध्या मिनिटात mic unmute करून त्यानंतर आलेली प्रतिक्रिया आणि असे ऑफलाईन भेटून एखाद्या काव्यास पटकन समोरून आलेली ‘वाह’ अशी उत्स्फूर्त दाद यात वेगळीच नशा आहे हे मात्र नक्की.
तेव्हा असेच वारंवार भेटत राहू या व आनंद देत-घेत राहु या! 🙏🙏🙏