जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या कवयित्री लेखिका सायली कुलकर्णी यांच्या “गूज अंतरीचे” या कविता संग्रहाचे प्रसिद्ध कवयित्री निशा डांगे यांनी केलेले समीक्षण…
“मनाच्या तरल भावभावनांचे लयबद्ध मुक्त प्रगटीकरण म्हणजे काव्य!” मनाच्या अंतरंगात काव्यलहरींची गूज होते. या काव्यलहरी थेट लेखणीवर येऊन आदळतात. मनाच्या उत्कट भावना आणि लेखणी यांच्या सुरेख संगमातून अवतरते एक नितांत सुंदर कविता!
वडोदरा येथील कवयित्री सौ. सायली कुलकर्णी यांनी आपल्या लयबद्ध कवितेतून जीवनाचे विविध कंगोरे मांडले आहेत. त्या आयुष्यावर भरभरून प्रेम करतात. मास्टर इन फार्मसी ही पदवी घेऊन त्या वडोदरा येथे फार्मा कंपनीत कार्यरत आहेत. नोकरी, प्रपंच सांभाळून त्यांनी आपला काव्यछंद जोपासला आहे. औषधांच्या वासातूनही त्यांच्या काव्यपुष्पांचा सुगंध अत्तराप्रमाणे दरवळला. कोरोना काळात भेटलेल्या सक्तीच्या सुट्ट्यांच्या सुवर्ण संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घेतला. या काळात त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेला उजाळा दिला. त्यांच्या काव्यप्रतिभेची प्रचिती अर्थात त्यांचा ‘गूज अंतरीचे’ हा काव्यसंग्रह!
विविध साप्ताहिक, मासिके, वृत्तपत्रे, स्टोरी मिरर, शॉपिझन, वेब पोर्टलच्या माध्यमातून ‘गूज अंतरीचे’ काव्यसंग्रहातील कविता पूर्वप्रकाशित आहेत. कवयित्री सायली कुलकर्णी यांच्या कवितांचे सादरीकरण रेडिओ के जे वरील ‘नजराणा कवितांचा’ या रंगारंग कार्यक्रमात झाले आहे. कलानागरी वेलफेअर सोसायटी अमरावती कडून ‘कविरत्न पुरस्कार २०२१’ साठी त्यांची निवड झाली आहे.
कवयित्री सायली कुलकर्णी यांचा ‘गूज अंतरीचे’ हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. शॉपिझन पब्लिकेशन हाऊस तर्फे प्रकाशित सायली कुलकर्णी यांच्या या पहिल्या काव्यसंग्रहात नवखेपणा जाणवतो परंतु त्याचबरोबर अशायगर्भित कवितांचे सशक्त सृजन देखील वाचकांना वाचायला मिळते. सुख-दुःखांच्या क्षणांची सुंदर गुंफण, भावभावनांचा कल्लोळ, जिव्हाळ्याची नाती जपणाऱ्या, सकारात्मक प्रेरणादायी तसेच अध्यात्माची जोड असलेल्या ५१ सुंदर कवितांचा नजराणा त्यांनी काव्यरसिकांना ‘गूज अंतरीचे’ या काव्यसंग्रहाच्या स्वरूपात दिला आहे.
सामाजिक जाणिवा आणि नेणिवा जपत विविधांगी विषय कवयित्रीने हाताळलेले आहेत. जीवनावर तर त्या नितांत प्रेम करतात. त्यांची जीवन जगण्याची सकारात्मकता वाचकांना नव्या उमेदीने जगण्याची सकारात्मक ऊर्जा देते. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन कवयित्रीच्या प्रगल्भ विचारांची प्रचिती देतो. जीवनावर त्यांनी आपल्या विविध कवितेतून भाष्य केले आहे. जीवन हे त्यांना वेगवेगळ्या वळणावर नवीन भासते. ‘जीवन सुंदर आहे’ या कवितेतील ओळी
‘जीवन म्हणजे ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ असतो’
‘कितीही कडक ऊन पडले तरी पाऊस हा नक्की येतो
थकल्या भागल्या जीवांना नवसंजीवनी देऊन जातो’
‘जीवन सुंदर आहे गड्या निखळ जगता आले पाहिजे
आनंदाचे चार क्षण वेचता आले पाहिजे’
जीवनात सुख-दुःख हे ऊन सावलीप्रमाणे लपाछपीचा खेळ खेळत असतात. दुःखापाठोपाठ सुख येणारच हा सृष्टीचा नियम आहे. चार दिवस दुःखाचे तर चार दिवस सुखाचे! कठीण परिस्थितीत संकटांचा सामना करत दुःखाला जिंकून सुखाच्या क्षणाचे स्वागत करता आले पाहिजे. कवयित्रीचा सकारात्मक आशावादी दृष्टीकोन वाचकांच्या रोमारोमात शिरतो.
गूढ रात्रीच्या काळोखातूनच नव्या युगाची नवी आशा प्रसवते. रात्रीनंतर दिवस हे निसर्गाचे कालचक्र आहे. प्रत्येक नव्या पहाटे एक नवे स्वप्न डोळ्यात घेऊन नव्या दिवसाची सुरुवात करायला हवी असा सल्ला त्या आपल्या मैत्रिणीला नवी पहाट या कवितेतून देतात.
‘नको होऊस निराश सखये थोडा धीर धर
पानगळ झाली तरीही पुन्हा येतोच ना गं बहर’
श्रद्धा आणि सबुरी यांचे निश्चित चांगले फळ माणसाला जीवनात मिळते. त्यासाठी फक्त दुःखात संयमाने थोडी कळ सोसावी लागते. त्यानंतर मिळणारे सुख हे अलौकिक असते. त्या सुखाचे वर्णन तरी काय करावे! सुखाच्या अनेक परिभाषा त्यांनी ‘सुख म्हणजे’ या कवितेत केल्या आहेत.
‘सुख म्हणजे स्वप्नपूर्तीचा आनंद
सुख म्हणजे वेळात वेळ काढून जपलेला छंद’
‘जीर्ण वस्त्राची कहाणी’ या कवितेची काहीशी मांडणी गझलेच्या स्वरूपात त्यांनी केली आहे.
‘आयुष्य फाटलेल्या पदरात घेतले मी
क्षण ते आनंदाचे भरपूर वेचले मी’
सुख दुःखाचे अनेक सोस सोसून कुठल्यातरी एका वळणावर आयुष्य जीर्ण होते आणि आभाळ फाटल्यागत फाटत जाते. या फाटक्या आयुष्याच्या पदरातही कवयित्री आनंदाचे भरपूर क्षण वेचून घेतात. अर्थात माणसाने कोणत्याही परिस्थितीत आनंदाने जगावे हा मौलिक संदेश या कवितेतून त्या देऊन जातात.
गतिमान असलेल्या कालचक्रावर सर्व सृष्टीचक्र अवलंबून आहे. कालचक्राचे गणित मानवी आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे. या विषयावर कवयित्री सायली कुलकर्णी लिहितात…
गती या कालचक्राची
भल्याभल्यां नाही कळे
फासे पडता उलटे
अश्रू डोळ्यांतूनी गळे
कवयित्रीला निसर्गसौंदर्याची भुरळ पडते. निसर्गातील ऋतुचक्र, सृष्टीचक्र यांचे सूक्ष्म निरीक्षण त्या करतात. निसर्गातील प्रतीके व प्रतिमान यांची सांगड त्या मानवी जीवनाशी साधत सकारात्मक प्रेरणा त्या वाचकांना देतात.
इवले कोवळे बीज सखे सांग
लगेच कोठे रुजते
कवच धरेचे भेदल्याविन का ते
धरेवरी अवतरते
अशा सहजसोप्या भाषाशैलीतून त्या अशायगर्भित रचनांचे सृजन करतात.
‘स्वच्छता तेथे सुंदरता!’ स्वच्छ घरात लक्ष्मी, सरस्वती लाभते तसेच स्वच्छ मनात विचारांची प्रगल्भता नांदते. मनातील विकार, षडरिपूंना नष्ट करण्यासाठी त्या चक्क मनाची साफसफाई करतात. ‘साफसफाई’ या कवितेत सायली कुलकर्णी म्हणतात….
मी ठरवलं एकदा आपलं मन आवरायला घ्यायचं
साचलेली जळमटं काढून मन स्वच्छ लख्ख करायचं
कर्म आणि भोग यांची अनन्यसाधारण जोड प्रत्येक जन्माला येणाऱ्याच्या दैवात लिहिलेली असते. कुणाला प्रमाणाच्या बाहेर सुख संपत्ती लाभते तर कुणाजवळ एकवेळचे पोट भरेल एवढे सुद्धा नसते, त्यासाठी लिहिले असतात अपार कष्ट आणि भाकरीसाठी वणवण……. ही दैवासमोर मानवी जीवनाची हतबलता कवयित्री सायली यांनी हृदयस्पर्शी कवितेतून मांडली आहे…..
बाप बडवितो ढोल
भर दुपारची वेळ
माय बाप आणि लेक
करी डोंबाऱ्याचे खेळ
नशिबाचे भोग भोगूनही आनंदाने जगायचे असते. आपल्या ‘भोग’ या कवितेत त्या म्हणतात…..
‘सांगा बरं देवाला तरी भोग काही चुकले का?
देव असूनही रामाला वनवास सांगा टळला का?’
स्त्री हृदयात अनेक हळवे कोपरे असतात तर काही चोरखण सुद्धा असतात. गूज अंतरीचे उलगडून दाखवण्यासाठी कुणीतरी आपलं हवं असतं. कोरोनाच्या या भीषण संकटात माणसाला नातेसंबंधाची खरी किंमत कळली आहे. ‘आपलं माणूस’ या कवितेत कवयित्री म्हणतात… ..
‘भरले डोळे पुसण्यासाठी आपलं माणूस लागतं
आपल्या माणसांमुळेच गड्या आयुष्य सुंदर बनतं’
आढळून आलेल्या उणिवा
काव्यसंग्रहात बऱ्याच बाजू जमेच्या असल्या तरीही काही उणिवा आढळून येतात. काव्यलेखन करतांना प्रचलित भाषेचा वापर करायला हवा. ‘मम, तुज, आणिले, जाणिले, आणिला या शब्दांएवजी मला, तुला, आणले, जाणले अशी प्रचलित शब्दयोजना करायला हवी.
‘माहेर म्हणजे माहेर’ असतं या संपूर्ण कवितेत प्रत्येक द्विपदी मध्ये ‘असतं’ हे एकच यमक आहे.
चपखल आणि वेगवेगळी यमक योजना करायला हवी. त्यासाठी अशायसमृद्ध यमक साधून केलेली वाक्ययोजना करावी.
कवयित्री पुढच्या संग्रहात वरील दुरुस्ती नक्कीच करतील यात काही शंका नाही.
मानवी मनोवृत्तीचे कंगोरे, नातेसंबंधातील जिव्हाळा, निसर्ग, सृष्टी यांचे सुंदर वर्णन तसेच सामाजिक समस्यांना अधोरेखित करत कवयित्री सायली कुलकर्णी यांनी ‘गूज अंतरीचे’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून वाचकांना दिलेली सकारात्मक प्रेरणा वाखाणण्याजोगी आहे.
कवयित्री सायली कुलकर्णी यांना पुढील साहित्य प्रवासासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा!
समीक्षक:- निशा डांगे/नायगांवकर
पुसद
संपर्क:- 8329065797
काव्यसंग्रह:- गूज अंतरीचे
कवयित्री:- सायली कुलकर्णी (वडोदरा)
संपर्क:- 9763043958
मुखपृष्ठ:- ऋषिकेश कुलकर्णी
पहिली आवृत्ती:- ऑगस्ट २०२१
प्रकाशन:- शॉपिझन पब्लिकेशन हाऊस
मूल्य:- १६५ रु/- केवळ