कार्यालयावर मोर्चा; कल्पना न दिल्याने नाराजी, जबाबदार अधिकारी नॉटरिचेबल…
सावंतवाडी
शहरात विद्युत वितरणने कोणतीही कल्पना न देता मध्यरात्री अचानक भारनियमन केल्याने नागरिक संतप्त झाले. यावेळी त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र या सर्व परिस्थितीला जबाबदार अधिकाऱ्यांनी आपले फोन बंद ठेवल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दरम्यान पहाटे ३:०० वा. हा मोर्चा कोलगाव येथील सब स्टेशनकडे वळवून त्या ठिकाणावरून विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष समीर वंजारी, देव्या सूर्याजी, विनायक गावस, सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, आदिंसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शहरातील नागरिकांना कोणतीही कल्पना न देता विद्युत महावितरण कंपनीने अचानक रात्री १२:०० ते २:५० या वेळेत भारनियमन पुकारले. याचे तीव्र पडसाद तात्काळ नागरिकांमधून उमटले. यावेळी संतप्त नागरिकांनी येथिल महावितरणच्या कार्यालयाकडे गर्दी करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल बंद ठेवल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नंतर पहाटे ३:०० वाजता संतप्त नागरिकांचा मोर्चा थेट कोलगाव येथील सब स्टेशन कडे वळला व तेथून विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. यावेळी उपस्थित पोलिसांनी सुद्धा आंदोलन कर्त्यांना सहकार्य करत यशस्वी मध्यस्थी केली.