You are currently viewing धर्मांतर म्हणजे काय ?

धर्मांतर म्हणजे काय ?

धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धर्मातर हा प्रकार योग्य की अयोग्य ?*

 

धर्माचा प्रचार व प्रसार करणे याचा अर्थ असा नाही की परधर्मियांना आपल्या धर्मात ओढून आपापल्या धर्माच्या लोकांची संख्या वाढवत ठेवणे. मायलेकराची बुद्धीपुरस्सर ताटातूट करणे हे जसे फार मोठे पाप आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही कारणास्तव एखाद्या माणसाचे धर्मांतर करून त्याची त्याच्या धर्मापासून, आईबापापासून, बंधुभगिनीपासून व धर्मबंधूपासून ताटातूट करणे हे महापाप आहे. धर्माचा प्रसार करणे याचा अर्थ माणसाची नीती व उन्नती घडवून आणून त्यांच्यातील माणुसकी जागृत करणाऱ्या धर्माच्या उच्च तत्त्वांचा व मूल्यांचा प्रचार करणे हा होय. त्यासाठी धर्मांतर हा प्रकार अर्थशून्य आहे. धर्मांतर घडवून आपण धर्माची फार मोठी सेवा करतो असे ज्या धर्ममार्तंडांना व स्वार्थांध पुढाऱ्यांना वाटते ते भ्रमाच्या साम्राज्यात नांदतात, असे खेदाने म्हणावे लागते. असंख्य मूर्ख एकत्र आले तरी त्यांच्यातून एकही शहाणा निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे अडाणी, अशिक्षित किंवा काही कारणामुळे अत्यंत अगतिक झालेल्या अनेक परधर्मीय माणसांना लालूच दाखवून किंवा जबरदस्तीने आपल्या धर्मात ओढल्याने एकही खरा धार्मिक माणूस निर्माण होत नाही.

 

*– सद्गुरू श्री वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा