*भजन या विषयासंबंधी जनमानसांत बरेच गैरसमज असलेले दिसून येतात. सामान्य माणसे ज्याला भजन म्हणतात व संतांना अभिप्रेत असलेले भजन या दोहोमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते. लोकांचा असा गैरसमज आहे की देवाचे भजन करण्यासाठी गळा गोड पाहिजे. गायनाचे अंग असले पाहिजे व साथ करण्यासाठी टाळ, मृदुंग, पेटी वगैरे वाद्ये असली पाहिजेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र याच्या उलट आहे.*
🎯 *हृदयातील भगवंताचे भक्ती-भावे नित्य भान घेणे,हे देवाचे भजन तर टाळ-मृदुंगावर अभंग गायन करणे याला बुवाचे भजन असे म्हणतात.*
🎯 *शुद्ध भावाने,देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच,याच्या उलट धन,मान,मोठेपणा मिळविण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते.*
🎯 *स्वस्वरूपाचे अखंड भान या नांव भगवंताचे भजन.*
🎯 *भजन या सदराखाली जे काही केले जाते ते सामान्यपणे देवाचे भजन नसून बुवाचे भजन असते.*
🎯 *भगवंताशिवाय काहीही न सुचणे व रूचणे अशी मनाची जी अवस्था,अवस्थेला भजन असे म्हणतात.*
🎯 *आत्मियतेने भगवंताचे भान घेणे म्हणजे भजन.*
🎯 *’भगवत् भावाचे चित्तांत धारण” म्हणजे भजन, या भावधारणेतून प्राप्त होते ते स्वानंदाचे भोजन व सिद्ध होतो तो भगवंत.*
🎯 *विकारांचा विटाळ टाळून विठ्ठलाला प्रसन्न करून घेण्यासाठीच हातात टाळ घ्यावयाचे असतात,हे तत्त्व विसरून केलेले भजन हे भजन नसून केवळ टाळकुटी होय.*
🎯 *भजन करणे म्हणजे नुसते टाळ वाजविणे नव्हे.भक्तिभावाने भगवंताचे स्मरण करून चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भजन.*
🎯 *नियमाने भजन करणे ही गोष्ट मोठी.परंतु नियमासाठी भजन करणे ही गोष्ट छोटी.*
🎯 *भजन म्हणजे भगवत् प्रेमामृताचे भोजन.*
🎯 *भाव हा भजनाचा आत्मा आहे.*
🎯 *भावना भगवंताजवळ भावपूर्वक व्यक्त करणे,या नांव भजन.*
🎯 *‘एकमेकांनी एकमेकांना सुखाने जगू देणे’ हेच आहे भगवंताचे भजन,तेच आहे देवाचे पूजन व तोच आहे खरा धर्म.*
🎯 *संतांना अभिप्रेत असलेले भजन व टाळ सुरावर केलेले भजन यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे.*
🎯 *भगवंताचे अखंड स्मरण या नांव भजन.*
🎯 *दोन तास टाळ कुटायचे व बाकीचा सर्व वेळ कुटाळकी करण्यात घालवायचा,याला भजन म्हणत नाहीत.*
🎯 *सदैव ईश्वरस्मरणांत असणे, याला भजन असे म्हणतात.*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏