नापणे येथे ऊस पिक चर्चा सत्राचे आयोजन
वैभववाडी
तालुक्यात ऊस संशोधन केंद्र उभारणीत माजी आ. प्रमोद जठार यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रकल्प आणि जठार हे नातं अतूट आहे. केंद्रशासनाच्या मदतीने भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देऊन त्यांना आत्मनिर्भर करणारच असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. नापणे ऊस संशोधन केंद्र याठिकाणी ऊस पिकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आ. प्रमोद जठार, माजी सभापती अक्षता डाफळे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, उपनगराध्यक्ष संजय सावंत, सरपंच प्रकाश यादव, बाप्पी मांजरेकर, सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, प्राची तावडे, बंड्या मांजरेकर, किशोर दळवी, नगरसेवक बबलू रावराणे, प्रकाश काटे, प्रदीप जैतापकर, राजू पवार, उत्तम सुतार, सरपंच अवधुत नारकर, प्रदीप नारकर, शुभांगी पवार, दत्तू सावंत, बाबा कोकाटे, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितेश राणे पुढे म्हणाले, माजी आमदार जठार यांनी आपल्या पदाचा, ओळखीचा पुरेपूर वापर तालुक्याच्या विकासासाठी केला आहे. त्याचे उत्तम उदाहरण ऊस संशोधन केंद्र आहे. खासदार विनायक राऊत व आ. नाईक हे विकास कामात खो घालण्याचे काम करत आहेत. परंतु याला अपवाद जठार आहेत. त्यांनी विकासकामे कधीच थांबवली नाहीत असे सांगितले. शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार गंभीर आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताकद दिली जाईल असे सांगितले. प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आ. राणे म्हणाले, भाजपा प्रवेशानंतर काहींनी आम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून स्वीकारले. त्यापैकीच माजी आमदार जठार हे आहेत. त्यांनी मला मोठ्या भावाची ताकद दिली. चांगल्याला चांगलं म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात लवकरच साखर कारखाना होईल. त्याचा पुढाकारही प्रमोद जठार घेतील. एका विचाराने ते कामे मार्गी लावतील असे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.