ग्राहक पंचायतने केली स्टॅम्प उपलब्ध करून देण्याची मागणी.
वैभववाडी
वैभववाडी पोस्ट ऑफिससह जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये रेव्हेन्यू स्टॅम्प उपलब्ध नाहीत. एक महिनाभरापासून रेव्हेन्यू स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत पोस्ट ऑफिसच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर रेव्हेन्यू स्टॅम्प उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग,सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने करीत आहोत.
रुपये पाच हजार वरील आर्थिक व्यवहार करताना, पगार पत्रक यासाठी रेव्हेन्यू स्टॅम्प आवश्यक असतो. स्टॅम्प उपलब्ध नसल्यामुळे अनेक आर्थिक व्यवहार थांबलेले आहेत. पोस्ट विभागातील संबंधित अधिकार्यांनी याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर रेव्हेन्यू स्टॅम्प उपलब्ध करून आर्थिक व्यवहाराची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.
वैभववाडी येथील पोस्ट ऑफिसमध्ये गेले महिनाभर रेव्हेन्यू स्टॅम्प उपलब्ध नाहीत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने मालवण आणि सिंधुदुर्गनगरी येथील पोस्ट कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून चौकशी केली असता रेव्हेन्यू स्टॅम्प उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.