19 एप्रिल रोजी मुंबईतील सोहळ्यात होणार पुरस्कार प्रदान
इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या महिला बचत गटाच्या समन्वयक व सामाजिक कार्यकर्त्या नजमा गुलाब शेख यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 19 एप्रिल रोजी मुंबई येथे संपन्न होत आहे.
नजमा शेख या मागील 15 वर्षापासून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेत महिला बचत गटाच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे व माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काम करत आहेत. महिलांनी स्वावलंबी बनून स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याद्वारे आजवर तब्बल 1800 बचत गट बँकेशी जोडले गेले आहेत. आवाडे जनता बँकेच्या माध्यमातून विविध उद्योग-व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करुन त्यांना उद्योजिका बनविले जात आहेत. यामध्ये नजमा शेख या समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. यामध्ये त्यांना संचालक स्वप्निल आवाडे, माजी सीईओ विजय कामत तसेच विद्यमान सीईओ संजय शिरगांवे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. शेख यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने त्यांची गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.