वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात रेडी हे निसर्ग संपन्न गाव. रेडी गावात सुरू असलेल्या खाणकाम व रेडी बंदर यामुळे रेडी गाव प्रथमतः प्रसिद्ध झाले. रेडी गाव चे पूर्वीचे नाव रेवतीद्वीप, रेवती पट्टण किंवा रेवतीनगर असे होते. इ.स. तेराव्या शतकात रेवती नगर वर सत्तेश्वर राजाची सत्ता होती. या काळात नाथपुरुष संप्रदायाच्या सिद्ध पुरुषाच्या सिद्ध विद्येने राजा सत्तेश्वर भयभीत झाला व त्यांच्यातील संघर्षाने रेवती नगर लयास गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
साधारण गेल्या पन्नास वर्षापासून रेडी गावामध्ये मॅंगनीज खनिज सापडल्यामुळे खाण उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे रेडी गावात खाण उद्योगासाठी खनिज ने आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डंपर वाहतूक सुरू असते. त्यावेळी रेडी नागोळेवाडी येथील सदानंद कांबळी यांना 1976 मध्ये खनिज ने-आण करताना आता ज्या ठिकाणी मंदिर आहे तेथे झोप लागली. त्यावेळी गणपती त्यांच्या स्वप्नात आला व आपण जमिनीखाली असल्याचा साक्षात्कार करून दिला. कांबळी यांनी ही बाब इतर ग्रामस्थांना सांगितली व रेडी ग्रामदैवतेला कौल लावून खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी जमीनीखाली जांभा दगडात कोरलेली श्रीगणेशाची देखणी आणि भव्य मूर्ती सापडली. त्यानंतर महिनाभरातच गणपतीचे वाहन असलेल्या उंदराची ही मूर्ती त्याच परिसरात सापडली.
अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती दोन हात असलेली द्विभुज मूर्ती असून तिची उंची सहा फूट व रुंदी 3 फूट आहे. ही मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. मूर्तीच्या एका हातात मोदक असून एका हाताने आशीर्वाद देत आहे. काही वर्षांनंतर ग्रामस्थांनी या मूर्तीचे सुशोभीकरण केले. श्री गणेशाची मूर्ती सापडल्या नंतर त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करून 1978 मध्ये श्री गणेशाचे मंदिर बांधण्यात आले. तद्नंतर 2019 पासून आजपर्यंत श्री.गणेश मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थानां पैकी धार्मिक पर्यटन क्षेत्रातील प्रमुख स्थळ म्हणून रेडी येथील श्री गणेश मंदिर गणले जाते. 18 एप्रिल हा द्विभूज गणेशाचा वाढदिवस, त्यामुळे दर वर्षी 18 एप्रिल ला श्री गणेशाचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे माघी गणेश जयंती, अनंत चतुर्दशी, अंगारकी संकष्टी व दर महिन्यातील संकष्टी ला देखील भव्य दिव्य स्वरुपात उत्सव साजरा केला जातो. देशभरातून अनेक गणेशभक्त रेडी येथील श्री गणेशाच्या दर्शनासाठी येतात.
रेडी हे वेंगुर्ले तालुक्यातील अत्यंत देखणे गाव. माडा पोफळीच्या बागा गावाच्या सभोवताल असलेला अरबी समुद्रकिनारा समुद्रात काही अंतरावर मामा-भाचे खडक, घंगाळ देवस्थान व त्याच्या समोरील छोटासा बेट, यशवंत गड, एकीकडे तिवरेवाडी, नागोळे वाडीचा लाल मातीचा समुद्र तर दुसरीकडे सिद्धेश्वर व यशवंत गडाजवळील सफेद वाळूचा समुद्र. अशी अनेक वैशिष्ट्ये रेडी गावात पाहायला मिळतात. रेडी हे खनिज वाहतुकीचे एक महत्त्वाचे बंदर देखील आहे. खनिजाचा साठा विपुल प्रमाणात मिळाल्यामुळे गेली पन्नास वर्षे रेडी गावात मायनिंग उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आजही रेडी गावात काही अंशी मायणी उद्योग सुरू आहे. रेडी गावातील ग्रामदैवत श्री देवी माऊली ही स्वयंभू असून आदिमाया स्वरूप आहे. रेडी गावात श्री विठ्ठल मंदिर, श्री महादेव मंदिर, तिवरेवाडीतील दत्त मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, कनयाळ येथील हनुमान मंदिर, अष्टभुजाधारी महिषासुर मर्दिनी चे रुप असलेले नवदुर्गा मंदिर, नागोबा मंदिर, गारुडी मंदिर, सत्पुरुष मंदिर, नारायण मंदिर, रंगनाथ मंदिर, साईबाबा मंदिर अशी अनेक मंदिरे रेडी गावात पहावयास मिळतात. रेडी गावातील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या खडकांवर विशालकाय लाटांचा मारा होत असल्याने लाटांच्या आवाजाने पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातो. गावाच्या तिन्ही बाजूला अरबी समुद्राचा वेढा पडल्याने ड्रोनच्या सहाय्याने पाहिले असता रेडी गावाचा आकार अवर्णनीय असा दिसतो.