जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास आण्णा यांचा अप्रतिम लेख
काल एका सैनिकांचं मनोगत ऐकत होतो, तसं सैनिकाला जवळून बघितलं नाही म्हणून इतकी त्याबद्दल संवेदना जाणवत नव्हती. मग अचानक त्याचा चेहरा बघितला, काळजाचा थरकाप उडाला माझ्या आणि त्यांचे शब्द ऐकून जणू कंठ दाटून आला. आपल्याला सहजपणे काटा रुतला तर अख्ख आभाळ डोक्यावर घेऊन बोंबलत फिरतो, पण त्या सैनिकांचा तर बंदुकीच्या गोळीने जबडा (गालातून गोळी आरपार गेलेली होती) फाटलेला आणि तो दवाखान्यात असतांना सुद्धा म्हणत होता की, “मला त्या आतंकवाद्यांना मारायचं आहे”. यालाच म्हणतात का वास्तविकतेच्या पलीकडचे प्रेम?… जर ते प्रेम आहे तर मग आजची तरुण पिढी करते ते काय? हा प्रश्न पडतो मनाला… कोण तो सैनिक कोणास ठाऊक आणि तो या मायभूमीवर इतकं प्रेम का करतो? जणू काही तो ठेकेदार आहे आणि आम्ही सगळे फक्त असेच. आम्ही सुद्धा प्रेम करतो! पण कोणावर? त्याने मला सहज विचारलेला प्रश्न. आईवर, वडिलांवर, बहीण-भाऊ, प्रेयसी मैत्रिणी यांच्यावर. पण तुम्ही कोणावर करता? तो म्हणाला, “मी सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर करतो आणि मग मी ज्या वेळी जिथे उपस्थित असतो त्या प्रेमाची तिथे उधळण करून पुन्हा मायभूमीकडे जातो. समजले नाही?” तो म्हणाला की, “वर्षात दोन तीन वेळा रजेवर येतो, आलो की पहिल्या दिवशी आईला कुशीत, दुसऱ्या दिवशी ताईच्या सावलीत, तिसऱ्या दिवशी नातेवाईकांना ( कारण त्यांचा रुसवा अधिक दिसतो) मग मुलं, मित्र परिवार, शेवटी काही दिवस परतीच्या चिंतेत, घरी आल्यावर जबाबदाऱ्या पार पाडत वेळ निघून जातो, आणि मग त्यामध्ये कुठंतरी जीवनातील सगळ्यात कमी वेळ मिळतो तो पत्नीला”. सगळ्यांना जवळ करता करता तो तिच्याकडे लक्षच देत नाही. सैनिक तर मातृभूमीला अर्पण आहे पण पत्नीने काय अपराध केला की तिला तिचा वाटा न मिळो? विरहाच्या वेदना आपल्या पापणीत लपवून सदैव सगळ्यांना सोबत घेऊन वडिलांच्या हिश्यातील प्रेम मुलांना देऊन? दुरावलेल्या मनाला समज घालून दोघे असेच दिवस काढतात. कधी वेळ मिळाला तर एका भेटीत त्यांच्या विरहाच्या सगळ्या वेदना विसरून त्या दोघांना एक नवीन संजीवनी प्रदान करतात. मातृभूमी खरंच सैनिकांची मक्तेदारी झाली आहे ना! हो, खरंच आहे…. कारण आपण तर जातीवर प्रेम करतो आणि ते मातीवर. आणि माती कधीच भेदभाव करत नाही. कदाचित हिच सगळ्यात मोठी ताकत आहे त्यांची, कारण या देशात, आपल्या संबंधांसाठी, जातीसाठी, वर्णासाठी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे आपल्या स्वार्थासाठी नाहीतर हितासाठी लढतांना दिसतात. पण जर देश नाही तर आपले अस्तित्व कुठं आहे? सैनिकांना मातृभूमीवर प्रेम आहे म्हणून त्यांच्यात जात नाही, धर्म नाही, ते सगळे एका तिरंग्याला समर्पित आहेत. कारण ते खरंच आपल्या मातृभूमीवर प्रेम करतात. वास्तविक त्याच्या पलीकडे आपणही त्याच मातीवर झोपतो आहोत. मग आपण निस्वार्थी झालो नाही आणि जोपर्यंत आपण निस्वार्थी होत नाही तोपर्यंत वास्तविक प्रेम सुद्धा करू शकत नाही.
रामदास आण्णा
७९८७७८६३७३