कणकवली,
विलिनीकरणाच्या मु्द्दयावर गेले पाच महिने संपात सहभागी झालेले सुमारे १२०० एस.टी. कर्मचारी उद्या १८ एप्रिल पासून पुन्हा एस.टी. सेवेत रूजू होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ठप्प झालेली एस.टी.ची सेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेवेत रूजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी आणि त्यानंतर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतरच या कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.
सेवेत रूजू होणाऱ्या एस.टी. कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची कामगार संघटनांच्या कोअर कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनंत रावले यांनी भेट घेतली. यावेळी कामगार अधिकारी एल.आर.गोसावी, विभागीय वाहतूक अधिकारी मोहन खराडे, यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी अनंत रावले, राेशन तेंडुलकर, गणेश शिरकर, दत्ता पाताडे, प्रभाकर कामत आदी उपस्थित होते.
कामगार संघटनांच्यावतीने अनंत रावले यांनी बडतर्फ आणि निलंबित असलेले कामगार तसेच संपात सहभागी असलेल्या कामगारांवर कोणती कारवाई होणार, याबाबतचे धोरण स्पष्ट करावे अशी भूमिका मांडली. तर विभाग नियंत्रक श्री. रसाळ यांनी २२ एप्रिल पर्यंत रूजू होणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे महामंडळाचे निर्देश असल्याचे सांगितले. याखेरीज जे बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होण्यास इच्छुक आहेत, त्यांनी रीतसर अपील दाखल करावे. नियमानुसार त्यांच्या अपिलावर सुनवणी होऊन त्यांनाही सेवेत रूजू करून घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र संपकरी कर्मचारी पाच महिन्यानंतर पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. त्यामुळे या सर्व कामगारांनी प्रथम वैद्यकिय तपासणी होणार आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि नंतरच त्यांना ड्युट्या दिल्या जातील असे श्री.रसाळ म्हणाले. तर कंत्राटी कामगारांना ज्या पद्धतीने एका दिवसाचे प्रशिक्षण देऊन कामावर रूजू करून घेण्यात आले. त्याच धर्तीवर संपकरी कर्मचाऱ्यांनाही एका दिवसाचे प्रशिक्षण देण्यात यावे जेणे करून लवकरात लवकर एस.टी. सेवा सुरळीत होईल अशी मागणी अनंत रावले यांनी केली.
*आता एस.टी. कामगारांची नवी संघटना अस्तित्वात येणार*
यापूर्वीच्या कुठल्याच कामगार संघटनेने एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे पक्ष विरहीत नवी संघटना स्थापन जिल्ह्याची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपणाकडे देण्यात आल्याची माहिती अनंत रावले यांनी दिली. लवकरच विभागीय कार्यशाळा आणि प्रत्येक आगार निहाय समित्या स्थापन होतील. नव्या संघटनेला ८० टक्के कामगारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे लवकरच नवी संघटना स्थापन केली जाईल अशी माहिती श्री.रावले यांनी दिली.