जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख
कधी वाटतं,आयुष्य म्हणजेच एक नकाशा आहे. कुणा अज्ञात शक्तीने रेखाटलेला. आणि त्यात कुठेतरी एक
लँपपोस्ट आहे, जिथे लिहीले आहे की, YOU ARE HERE. तू इथे आहेस.
आजुबाजुला चारी दिशांना, अनेक वाटा लांबच लांब पसरलेल्या आहेत. आपल्याला आपली दिशा, आपले इच्छित स्थानक फक्त तिथे टाकायचे आहे आणि ‘सुरु करा’
हे बटन दाबल्यावर दिसणार्या त्या टोकदार बाणाबरोबर
चालायचे आहे. सारं किती सोप्पं आहे. वाट चुकण्याची शक्यताच नाही. आणि जर चुकलोच तर पुनर्दिशाकरणाचा
पर्याय आहेच की.
हा विचार मनात आला आणि सहज वाटलं की
आयुष्यभर आपण चालतच आहोत. स्वमनाशी वाट, दिशा
नक्की केलेली होती तरीही खूप वेळा भरकटलो. अनेकदा
मागे पुढे ,उजवीकडे,डावीकडे करावे लागलेच की. नकाशा
लावूनही.बाणाच्या निर्देशाप्रमाणे चालूनही वाट का चुकली?
कुठे हरवली ? कुठे भरकटली ?
कदाचित,चालता चालता ,आयुष्यातलेअंतर्जालच तुटले असेल. आणि म्हणून हरवलो कां? इतका लांबलचक रस्ता चालून आल्यावर ,इकडे तिकडे बघताना,
मागे वळून पाहताना जाणवत आहे की, ही वाटच आपली
नव्हती. आपणच चुकीची दिशा निवडली. चुकीचे बटन
दाबले आणि भलत्याच वळणावर येऊन पोहचलो. खरी वाट ही नव्हती. ती हरवली.
क्षणभर तरीही विचार करते. काय मिळालं आपल्याला या वाटेवर ? तशी दिमाखदार, लखलखीत, डोळे दीपवून टाकणारीच होती ना ही वाट ? वेड्यासारखे धावलो त्यावर. कितीतरी कांटे बोचले. आत वाहणारे निर्मळ झरे कोरडे होत गेले. न आवडणारं ,न पटणारं ही
मान्य केलं. मन रक्ताळलं. जखमा झाल्या. पण त्यावर
मलमपट्ट्या लावत राहिलो.
केव्हढा संचय केला. दौलत, किर्ती, मानमरातब, हौस
मौज, मजा !! सारी भौतिक सुखे गोळा करत , मोठ्या गर्वाने या रंगीन वाटेवर चालत राहिलो….
पण आज भोवती इतकं सारं असताना कां एकाकी
वाटतंय् ? कां उदास वाटतंय् ?
।हरवली वाट।दिशा अंधारल्या दाही।
ऊसवलं मनोगत सारं।आधार कुनाचा न्हाई।।
अशी मनस्थिती का असावी ?
आणि आता री राउटींग होत नाही. ना मागे ना पुढे.
एक सुंदर वाट मात्र धुक्यात हरवली.दूर गेली.
पण माझ्या अंतर्मनात ती कुठेतरी आहे. खोलवर
दडलेली. या वाटावाटांच्या जंजाळात ती हरवली होती. पण आता नको नकाशा. नको तो फसवा दिशादर्शक बाण.
त्या वाटेवरचे टाळ ,चिपळ्यांचे नाद माझ्या अंत:प्रवाहात
घुमत आहेत. आणि युगे अठ्ठावीस ,कर कटावरी ठेवून
ऊभा असलेला तो सावळा विठ्ठल मला बोलवत आहे.
ये.।।तुज आहे तुजपासी ।परि जागा चुकलासी।।
आता हरवलेली हीच पंढरीची वाट मला चालायची आहे!!
जिथे नाही मी तू पण.नाही श्रेष्ठ कनिष्ठ. नाही स्पर्धा. नाही धावणं. फक्त भेटी लागी जीवा लागलीसे आस….
राधिका भांडारकर