सावंतवाडी :
मळगाव येथील ओमकार प्रिंटिंग प्रेसचे मालक गंगाराम निगुडकर (वय ५२ रा. वेत्ये) सध्या रा. सबनीसवाडा सावंतवाडी यांचे शनिवार दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मूळ वेत्ये येथील असलेले गंगाराम निगुडकर यांची मळगाव बाजारपेठ येथे ओंकार प्रिंटिंग प्रेस आहे. मागील आठवड्यात त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ.चितारी यांनी त्यांच्यावर सावंतवाडी येथे उपचार केले होते, परंतु त्रास जास्त जाणवू लागल्याने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले होते. कोल्हापूर येथे पुढील उपचार घेऊन डिस्चार्ज मिळाल्याने ते सावंतवाडी येथील सबनीसवाडा येथे पाच दिवसांपूर्वी आपल्या घरी आले होते.
शनिवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. गंगाराम निगुडकर हे प्रिंटिंग व्यवसायात असल्याने त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता, त्याच प्रमाणे मनमिळवू व हसतमुख स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता. शनिवारी रात्री त्यांच्यावर वेत्ये येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा जनसमुदाय जमला होता. गंगाराम निगुडकर यांच्या आकस्मित जाण्याने अनेकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.