मनसे विषय रेटून धरणार, प्रसंगी आंदोलन, प्रशासनाला इशारा…
सावंतवाडी
तालुक्यात घडलेल्या जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी होवून जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. दरम्यान आमच्याकडेही अशा प्रकारच्या ब-याच तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे मनसे सुध्दा हा विषय रेटून धरणार आहे. या विषयी गंभीर दखल घेवून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार , संतोष भैरवकर, संदेश शेट्ये, उप तालुकाध्यक्ष प्रकाश साटेलकर, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, डिंगणे ग्रा. प. सदस्य आदेश सावंत, विश्वनाथ राऊळ आदी उपस्थित होते.
श्री. उपरकर पुढे म्हणाले, मनसेने केलेल्या आवाहनानंतर जमीन घोटाळा प्रकरणात अनेकांच्या तक्रारी आपल्याकडे लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. तर काहींनी मोबाईल द्वारे संपर्क साधून आपल्या तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मनसेच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत. असे त्यांनी सांगितले. तर या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आम्ही मनसेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. तसेच आयुक्तांकडे सुद्धा याबाबत दाद मागणार आहोत. असेही ते यावेळी म्हणाले.