सावंतवाडी
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉलमध्ये भंडारी वधू वर मेळावा आयोजित केला होता. गेली दोन वर्षे एक धोरणामुळे कोणताही मोठा कार्यक्रम घेता आला नसल्याने दोन वर्षाच्या खडतर काळानंतर सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे घेतलेल्या वधु वर मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. जवळपास 300 पेक्षा जास्त वधू-वरांनी नोंदणी केली. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वधू-वर मेळाव्याला केवळ जिल्ह्यातील नव्हे तर रत्नागिरी,मुंबई, कोल्हापूर, गोवा आदी भागातून देखील मोठ्या प्रमाणात वधू-वर नोंदणीसाठी आले होते. जवळपास सातशे ते आठशे लोकांनी खचाखच भरलेल्या हॉलमध्ये अतिशय उत्साहाने वधू-वर मेळावा पार पडला.
सावंतवाडी तालुका भंडारी वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन भंडारी समाज जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन करून भाषणबाजी न करताच वधू वर मेळावा यशस्वी करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात केली. अनेक वेळा वधू-वर मेळाव्यासाठी उपस्थित असतात परंतु व्यासपीठावर जाऊन आपला परिचय देणे प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल पद्धतीने वधू-वरांची ओळख व्यासपीठावर मोठा डिस्प्ले लावून करून देण्यात आली. त्यामुळे आलेल्या प्रत्येक वधू-वराची माहिती इतरांना सहज उपलब्ध होत होती. या मेळाव्यासाठी नोंदणी करताना सुद्धा वेगवेगळे विभाग पाडून नोंदणी केली. दहावी ते बारावी, पदविका, पदवीधर, उच्च पदवीधर अशा प्रकारे वेगवेगळे विभाग करून नोंदणी केल्यामुळे आपल्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडताना वधू-वरांना खूप सोपे जाणार आहे. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या भंडारी भवन येथील कार्यालयात नोंदणी केलेले फॉर्म वेगवेगळ्या फाईल नुसार सर्वांना पाहता येणार आहेत.
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वधू-वर मेळाव्यासाठी भंडारी महासंघ जिल्हा सचिव विकास वैद्य, सदस्य जयप्रकाश चमणकर, आदी उपस्थित होते. सावंतवाडी तालुकाध्यक्ष जगदिश मांजरेकर, कार्याध्यक्ष दिलीप गोडकर, उपाध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, बाळा आकेरकर, सचिव दिलीप पेडणेकर,विलास माळगावकर, नामदेव साटेलकर, हनुमंत पेडणेकर, महिलाअध्यक्षा शीतल नाईक, प्रतिभा कांबळी, समता सूर्याजी आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. वधू-वरांची ओळख करून देताना सूत्रसंचालन सौ.गौरवी पेडणेकर, सौ. चिटणीस यांनी केले.