You are currently viewing शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

माडाच्या बनात सैनिकांची बैठक; नारायण राणे यांची उपस्थिती

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील विविध सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक पार पडली. विविध सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ग्रामविकास आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव करत सोसायटीवर पैकीच्या पैकी उमेदवार निवडून आणत आपलं वर्चस्व एक हाती सिद्ध केलं. महा विकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या कार्यपद्धती विरोधात उघडपणे इन्सुली परिसरात पडसाद उमटू लागले आहेत. सोसायटीच्या निकालानंतर गुरुवारी रात्री येथील माडाच्या बनात इन्सुली गावातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे नारायण उर्फ बबन राणे हे देखील उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या विरोधात उघडपणे नाराजी दर्शवित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जायचे नाही, परंतु संघटनेत सक्रिय राहायचे नाही. अपक्ष म्हणूनच या पुढील निवडणुका लढवायच्या, त्याचप्रमाणे मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत हे ज्या ज्या वेळी निवडणूक रिंगणात असतील त्यावेळी त्यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेण्यात आली.
सावंतवाडी तालुका शिवसेना तालुकाध्यक्ष म्हणून गेली दहा वर्षे रूपेश राऊळ हे कार्यरत आहेत. परंतु कणकवली येथे वैभव नाईक यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेले व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून वैभव नाईक यांच्यासाठी आपल्या अंगावर पोलिसांच्या लाठीमारास सामोरे गेलेले रुपेश राऊळ हे एका पुण्याईच्या जोरावर आज पर्यंत संघटनेतील सावंतवाडी तालुका प्रमुख पद आपल्या पदरात पाडून बेफिकीर व मनमानी कारभार करत आहेत. यांच्या मनमानी कारभारामुळे सावंतवाडी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे असा सूर शिवसेना पदाधिकार्‍यांची येथील पार पडलेल्या बैठकीत होता. शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर जाहीर नाराजी दर्शविताना इन्सुली ग्रामपंचायत आज पासून अपक्ष म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सावंतवाडी तालुक्‍यात आज पर्यंत झालेल्या ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या त्या-त्या प्रभागातील कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडून येत होते, परंतु तालुका प्रमुख म्हणून रुपेश राऊळ निवडणूक जिंकल्यानंतर त्या त्या विभागातील श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घेत होते. शिवसेनेचे इन्सुली येथील पदाधिकारी व कार्यकर्ते रुपेश राऊळ यांच्या मनमानी कारभारावर प्रचंड नाराज असून रुपेश राऊळ यांनी पक्षासाठी नेमकी काय भूमिका घेतली? व आजपर्यंत पक्षवाढीसाठी काय काम केले? असा प्रश्न विचारत आहेत. एकीकडे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता जनता पक्ष सावंतवाडी तालुक्यात भाजपा जोमाने वाढत असतानाच राज्यात सत्ता असूनही, मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही शिवसेनेला मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकतानाही मुश्कील होत आहे. त्यामुळे गावागावातील शिवसैनिक तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर प्रचंड नाराज असून भविष्यात नाराजी शिवसेना पक्षाला देखील भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी तालुका मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत दखल न घेतल्यास भविष्यात सावंतवाडी तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला अत्यंत वाईट दिवसाला सामोरे जाण्याची परिस्थिती येईल. असे शिवसैनिक खासगीत बोलू लागले आहेत. सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेला पूर्वीचे चांगले दिवस येण्यासाठी गावा-गावात शिवसेना पक्षाची वाढ होण्यासाठी शिवसेना जिल्हा नेतृत्व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना नक्कीच कठोर निर्णय घ्यावे लागतील तरच शिवसेनेला भविष्यात चांगले दिवस येतील आणि भारतीय जनता पक्षाच्या समोर लढण्याची ताकद मिळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा