You are currently viewing आनंदाच्या क्षणी…

आनंदाच्या क्षणी…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी यांचा अप्रतिम लेख

आनंद या जीवनाचा
सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सुर जैसा,
ओठातूनी ओघळावा

मनुष्याचा जन्मच मुळी आनंदातून झालेला आहे.तरी ही आपण मात्र नेमका तोच घ्यायला विसरतो.मागच्याच महिन्यात जागतिक आनंद दिन होता.ज्या आनंदाशिवाय आपल्या जीवनाला अर्थ येत नाही, त्याचा ही दिवस असतो याचे खूप आशचर्य वाटते.पण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक बाजूने पाहायला हवं म्हणून आपणही हा आनंद दिन दीन म्हणून न बघता हृदयातील आनंदापासून पाहू.

*आनंदाचे क्षण कैद करता आले कि मग आनंदाची* *कुपी जवळ ठेवल्यासारखं वाटतं*.
आपलं होतं काय कि आपला आनंद हा आपल्या शेजारच्यावर अवलंबून असतो.म्हणजे त्याने नवी गाडी घेतली पण जर त्या गाडी पेक्षाही भारी गाडी आपण घेतली कि मग आपण आनंदी.शेजारणीने एखादी साडी घेतली पण तिच्यापेक्षा महाग साडी आपण घेतली की मग आपण आनंदी. वस्तूंची यादी अशीच वाढत जाते,तसा आनंद ही आपल्या पासून दुरावत जातो.खरं तर या नादात आपण फक्त एक स्पर्धा पार पाडत असतो आणि त्यात जिवाच्या आकांताने धावत असतो. या सर्वात हरवत असतो तो आनंद.
लोकांना आपण आनंदी आहोत हे दिसणं जो वर तुमच्या दृष्टीने महत्वाचं असतं तो वर आपण फक्त आनंदी असण्याचं नाटक अथवा अभिनय करत असतो असंच म्हणावं लागेल.उर फुटुस्तोवर आज ज्या स्पर्धेत आपण धावतोय तिथं जिंकून आपण जर आनंदी होणार नसू तर अशा यशाचा काय उपयोग ?
आपल्या मुलाबाळांच्या लग्नात कर्जबाजारी होऊन ही देखावा करणे आणि लोकांना आपण किती आनंदी आहोत हे भासवणे मोठं अवघड असताना आपले लोक मात्र ते लीलया करतात आणि साध्या,सोप्या गोष्टीत आनंद मिळू शकतो परंतु त्यासाठी वृत्ती आनंदी व्हावी हे साधं गणित कळत नाही,याला काय म्हणावं.

*पुढे घडणाऱ्या घटनांची*
*चिंता करत बसणे म्हणजे एक प्रकारे न घेतलेल्या कर्जावरचे व्याज चुकवण्यासारखे आहे.*

हे माहित असूनही माझ्यासह आपण सगळेच जण हे काम नियमित करत असतो.
छोट्या छोट्या गोष्टीत ही आनंद भरलेला असतो. त्या साठी हवे असते लहान मुलांसारखे निष्पाप आणि निरागस मन.
आपण ही लहानपणी असेच होतो म्हणून तर आनंदी होतो.एका अवचित वळणावर आपण मोठे होतो आणि मग समजूतदारपणाचा बुरखा आपल्याला चढवावा लागतो आणि इथेच आपला आनंद मार खातो.आपल्या आयुष्यातला बराचसा आनंद हा
*लोक काय म्हणतील ?*

या एका वाक्याने हिरावून घेतलेला असतो.आपण हातचं सोडून नेहमी पळत्याच्या पाठीमागे लागत असतो,न मिळालेल्या गोष्टींचं माणसाला नेहमीच अप्रूप वाटत असतं.त्याच वेळी हातात त्या पेक्षाही मोलाची गोष्ट जरी असेल तरी त्याला त्याचे महत्व कळत नाही.त्याला हवं असतं आणखी,आणखी.

*लागतय काय जगायला*
*अन्न हवा आणि पाणी*
*मन मात्र मागत असतं आणि,आणि,आणि.*
हेच दुःखाचं मोठं कारण असतं .यावर काही जण म्हणतील कि मग माणसाने अल्प संतुष्टच असावे का ? कि प्रगती करूच नये ? प्रगती जरूर करावी पण मार्गात येणाऱ्या साऱ्या अवस्थांचा आनंद घेत करावी.
महत्वकांक्षा जरूर असावी पण तिचे रूपांतर राक्षसी महत्वाकांक्षेत होऊ नये इतकंच.
भविष्य काळासाठी आपण वर्तमान कितीही सुंदर असला तरी त्यात रममाण होत नाही,आपली सगळी नजर असते उद्यावर.त्यामुळे वर्तमानाचा आनंद घेता येत नाही आणि जेव्हा ते क्षण निघून जातात तेव्हा आपण भूतकाळ आठवत बसतो आणि त्याच्या वेदना मग आनंद हिरावून घेतात.एकूणच काय तर आनंद ही आपल्या साठी फक्त पुढे ढकलायची गोष्ट होऊन बसली आहे.
इतके पैसे आले,हे मिळाले ,ते मिळाले,हे झाले तर मी आनंदी होणार अशी आपली जणू अटच असते.खरं तर जीवनात आनंद देणारा क्षण कोणता या प्रश्नाचे उत्तर आहे तुमच्या जीवनातला आत्ता चालू आहे तो क्षण.
आर्थिक परिस्थिती आनंदात कधीच अडथळा ठरू शकत नाही.रिकाम्या खिशानेही माणूस आनंद अनुभवू शकतो.फक्त ती अंतरप्रेरणा मात्र हवी.त्यासाठी थोडं वेडं होता यायला हवं,तुम्ही शहाणे होता म्हणजे आनंदाला मुकता.
जे काम करायचं ते आनंदाने आणि पूर्ण समरस होऊन केलं कि आनंद कुठं दुसरीकडे शोधावा लागत नाही. तो असतो आपल्याच अंतरात.मग अगदी साध्या गोष्टीत ही आनंद भरलेला मिळतो.ओंजळभर मोगऱ्याची फुलं सुवासाने आनंदी करतात.अवती भवती फुललेला निसर्ग मनस्वी आनंद देतो. फक्त ती नजर हवी.आपल्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ति आपल्याला सुखच देतील हे कशावरून ? त्यातील काहीजण अथवा बरेच जण दुःख ही देतील,नव्हे देतातच.मग अशा वेळी काय करायला हवे.
*आनंदाने जगण्याचा एक सोपा उपाय म्हणजे, जी माणसं आपल्याकडं हक्काने येतात ती परत जाता कामा नये आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नये*.
माणसं येतात जातात परिस्थितीही बदलते. वाईट दिवस काय नेहमीच राहतात का ? म्हणून आपण मात्र आनंदाशी आपलं नातं तुटू द्यायचं नाही. आज निर्माण झालेली वाईट परिस्थिती, संकट हे कधी ना कधी दूर होणारच असते. याबाबतीत प्रसिद्ध विचारवंत खलील जिब्रान असे म्हणतात कि –
*अगर पतझड कहता की*
*वसंत का जनक हू मै*
*तो कौन मानता ?*

आपल्या आयुष्यात ही दुःखाच्या पानगळी नंतर आनंदाचा वसंत येणारच असतो.फक्त तो ऋतू म्हणून ठराविक वेळेत येण्यासाठी नसावा तर श्वासासारखा सदैव आपल्या सोबत असावा
*असंच आनंदाचं एक झाड आपण आपल्या मनाच्या मातीत लावु या,*
*आणि अंतरप्रेरणेचे पाणी देऊन त्याला सदैव टवटवीत ठेवू या.*
—————————-

*✒️सुजाता नवनाथ पुरी*
8421426337
अहमदनगर

प्रतिक्रिया व्यक्त करा