नाम आणि रामपंचायतन..
*सर्वसाधारणत:सामान्य माणसाचे मन हे बहिर्मुख असते.या बहिर्मुख मनाला साधनेच्या द्वारे अंतर्मुख करणे या गोष्टीला परमार्थात फार महत्त्व आहे.अंतर्मुख झालेले हे मन निरनिराळ्या अवस्थेतून जात असते.या अवस्थांचा थोडक्यात विचार करू.*
*”नाम व राम एकरूप आहे’ हा नामशास्त्राचा सिद्धांत आहे. नामस्मरण करताना मनाचे लक्ष नामावर रामावर स्थिर झाले तर ते मन लक्ष्मण होते.लक्ष मन लक्ष्मण साधनेत मनाचे लक्ष असणे याला फारच महत्त्व आहे.किती लक्ष जप केला याच्यापेक्षा जपात किती लक्ष होते यालाच अधिक महत्त्व आहे. एक लक्ष बेल शिवाला वाहणे याचा शब्दार्थ मोजून एक लक्ष बेल शिवाला वाहणे असा जरी असला तरी त्याचा भावार्थ एवढाच की, बेल वाहताना तो लक्षपूर्वक वाहिला जावा.म्हणूनच नामस्मरणात मनाचे लक्ष नामावर स्थिर झाल्यास ते मन हे लक्ष्मण आहे.नामावर मन स्थिर झाल्यावर ते हळूहळू उन्मन अवस्थेत प्रवेश करू लागते.*
*सुखाचि विश्रांति सुख समाधान।*
*मनाचे उन्मन नाम गातां ।।*
*हे उन्मन मन म्हणजेच हनुमान होय.*
*उन्मन झालेले मन नामात रमू लागते,रंगू लागते,रत होते.*
*नाम गोड नाम गोड। पुरे कोड सकळहि ।। मन रंगले रंगले। तुझे चरणी विसावले ।।*
*भक्तीत रत तो जाणावा भरत.नाम भक्तीत मन रंगू लागले,रत होऊ लागले की ते मन हे भरत होय. नामात रंगलेल्या मनात विकार राहूच शकत नाहीत.*
*तुका म्हणे देह भरला विठ्ठलें। काम क्रोधें केलें घर रितें ।।*
*अतृप्त मनात विकारांचे वादळ उठत असते;परंतु नामाच्या उच्च नामामृताचा लाभ झाल्यावर मन त्या नामामृताने संपूर्ण तृप्त होते. अशा झालेल्या मनातून विकार नाहीसे होतात.अशा तऱ्हेने विकाररूपी शत्रूंचे हे हनन करते म्हणून ते मन हे शत्रुघ्न होय.*
*शांती किंवा शीतलता ती जाणावी सीता नामाच्या उच्चाराने प्रेमानंदाचा प्रसाद प्राप्त होतो त्या प्रेमानंदाने मन शांत होते व सर्व इंद्रि आनंदाने भरून जातात. प्रेमानंदाच्या प्रसादाने शीतलता प्राप्त झालेले मन सीता होय.*
*नाम घेता कंठ शीतळ शरीर। इंद्रियां व्यापार नाठविती ।।*
*नामाचा उच्चार करता करता मनात,अंतःकरणात राम प्रगट होतो मन रामरूप होते.*
*मन रामनामी उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ।। कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे हृदयीं प्रगटे रामरूप ।।*
*मन हें राम झालें मन हे राम झालें राम राम म्हणतां मन हे राम झालें ।।*
*🙏सद्गुरु श्री वामनराव पै.🙏*