You are currently viewing माहेर

माहेर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच……लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक-कवी दीपक पटेकर यांची अष्टाक्षरी काव्य रचना

आठवण माहेराची
येते एकांती बसता
मन होते सैरावैरा
दूर माहेर असता

दुःख दाटता मनात
आठवती मायबाप
घडोघडी मिळालेले
प्रेम अपार अमाप

बालपणी अंगणात
खेळलेले खेळ सारे
झोक्यावर घेत झोके
आठवले दिस प्यारे

गाय वासरू गोठ्यात
वाट पाहती लेकीची
भावालाही लागलेली
ओढ प्रिय बहिणीची

वहिनीची माया होती
मोठ्या बहिणी सारखी
कधी नव्हती माहेरी
तिच्या प्रेमास पारखी

वाटे लावुनिया पंख
जावे उडुनी माहेरा
मन मंदिरात माझ्या
पडे आठवांना घेरा

लेक येता माहेराशी
घर आनंदे भरते
माया प्रेम मिळालेलं
कुठे लेकीस पुरते

(दीपि)
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा