जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा रामनवमी निमित्त लिहिलेला अप्रतिम लेख
श्रीराम आपले आराध्य दैवत , सर्व पापातून मुक्ती देणारे
पावन नाम .. मला ही तो पापातून मुक्त करेलच म्हणून
त्याला काही प्रश्न ..
सर्व जनतेचा पालनकर्ता राम , मातृ पितृ गुरू वचन पाळणारा
राम , रामराज्य म्हणजे सर्व सुखाचे आगर, जिथे कुठलाही
प्रश्न उपस्थित होत नाही, अशा राज्याचा पालनकर्ता राम ..
मग अशा राज्यात जी त्याची अर्धांगिनी आहे , त्याच्या इतकीच पवित्र व कर्तव्यदक्ष आहे, सुकोमल आहे , एका राजाची राजकन्या आहे, जिला रामाने जिंकले आहे, जी स्वत:ही त्यागमुर्ती आहे, त्या कोमलांगीला रामाने काय सुख दिले ?
प्रजेचे रक्षण करणे ज्याचे कर्तव्य आहे, पत्नी सोडा पण ती
रामाची प्रजा नव्हती काय ? पत्नी धर्म पाळतांना जी कुठेही
चुकली नाही त्या पत्नीचे चारित्र्य असे चव्हाट्यावर पंचनामा
होत असतांना तिच्यावर च विश्वास दाखवण्या ऐवजी ,
प्रजेतून एखादा अपवादात्मक रित्या सीतेचे चारित्र्यहनन
करत असेल तेव्हा फक्त प्रजाधर्मच महत्वाचा नि पत्नीप्रती
असहाय्य होऊन पतीधर्म ( सप्तपदीत दिलेली वचने) न पाळता
तिला गर्भार अवस्थेत, स्वत:चा राजवंश तिच्या उदरी वाढत
असतांना, जेव्हा तिला जास्तीत जास्त सुरक्षिततेची गरज
असतांना, तिला कसलीही पूर्वकल्पना न देता, रानावनात
श्वापदांच्या दुनियेत सोडून येण्याची आज्ञा करणे कुठल्या
राजधर्मात बसते..?
की स्रियांच्या बाबतीत पुराणकालापासून आजतगायत हेच
आपले भारतीय महान संस्कृतीचे आदर्श आहेत ? द्रौपदीचे
भर सभेत चारित्र्य हनन होत असतांना तथाकथित पुरूष
म्हणवणारे , वडिलधाऱ्यांसह सारे षंढ मानाखाली घालून बसले
त्यांचा ही द्रौपदीपदी काही ही राजधर्म नव्हता काय? प्रजेचे
रक्षण करणे, जो रक्षितो तो धर्म.. हा न्याय द्रौपदी ही एक प्रजा
होती ना..? मग कुठे गेला यांचा राजधर्म? प्रजा म्हणजे नक्की
कोण ? राजघराण्यातील स्रिया प्रजा म्हणवत नाहीत काय ?
सर्व इलाज संपल्यावर कृष्णाला कळवळून हाक मारताच
कृष्ण जो तिच्या बोलावण्याची वाट पहात होता , तो तात्काळ
मदतीला धावून आला, तसा विचार अपवाद किंवा प्रसंगी प्रजेचा रोष पत्करूनही रामाने का केला नाही ?
भिम अर्जुनाने दु:शासनाने द्रौपदीच्या वस्राला हात घालताच
भर सभेत त्याचे हात कलम का केले नाहीत ? युद्ध भडकले
असते , ते तर शेवटी झालेच ना ? हानी व्हायची ती झालीच
पण वेळीच दुष्टाला आवर घातला असता तर .. नक्कीच
युद्ध झाले नसते . पण नाही , स्रियांना किंमत ? छे, ती आमची
मानसिकता च नव्हती नि आज ही नाही ..कसले आदर्श
प्रस्थापित केले आम्ही? की ज्याची फळे आज ही हजारो नि:ष्पाप स्रिया भोगत आहेत ? इतकेच हाल स्रियांचे करायचे
होते तर जन्म तरी का दिला? की त्या साठीच जन्म दिला ?
प्रश्नांचा गुंता एवढा आहे तरी त्याचा मानवी पातळीवर विचार
न करता, (देवांनी मानव अवतार धारण केला होता ना? ),
ही त्यांची लीला होती? वा रे वा? इतकी भयंकर लीला असते?
उत्तरे मिळाली नाहीत की आम्ही शरण जातो नि लीला म्हणून
स्वत:ची सुटका करून घेतो हा कुठला भेकडपणा आहे? नाही
आम्हाला ही हेच हवे आहे, हेच त्याचे खरे उत्तर आहे. कारण
समाजात आजकाल जे चालले आहे ते हेच सुचविते..!
पाप लागेल म्हणून बोलायचे नाही ? अहो , लागू द्या ना पाप ?
खरे बोलण्याने पाप लागत नाही हे रामाला ही माहित आहे नि
क्षमा करणे त्याचा धर्म आहे ना ? मग काही प्रश्न मनात दाबून
ठेवून का जगायचे? म्हणून मी म्हणाले की मला ही तो माफ करेल अथवा न करो सर्वांना त्यातच विलिन व्हायचे आहे हे ही
तोच सांगतो ना ?पण … तुम्ही नक्कीच मला माफ करणार नाही हे मला माहित आहे तरी तुमच्याही मनात हे प्रश्न नाहीत हे म्हणण्याचं धाडस मी करणार नाही . तुम्हाला पटो न पटो …
बरंय् मंडळी,
तुम्ही मला माफ करावं ही माझी अपेक्षाच नाही . मी आणि राम आमचं आम्ही काय ते पाहून घेऊ , तुम्ही निश्चिंत
रहा. नि माझे काय होईल याची ही काळजी करू नका .
आणि हो .. ही फक्त नि फक्त माझी मते आहेत हे तुम्हाला
माहित आहे .
॥ धन्य वाद ॥
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १० एप्रिल रामनवमी
वेळ : दुपारी ३ : १२