*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य गजलेतील शिवाजी अशी ओळख असलेले अहमदनगर येथील डॉ.शिवाजी काळे यांची अप्रतिम गझल रचना*
दिसतो कसा माझा मदारी माहिती नाही मला
मग का चुकवतो मी उधारी माहिती नाही मला
ज्याने मला जीवन दिले त्याचे मिटवतो व्याज मी
संपेल केव्हा सावकारी……… माहिती नाही मला
घेऊन जातो सर्व नाणी……. दूत कोणी शेवटी
झालो कशाला मी भिकारी माहिती नाही मला
आयुष्य गेले ठेवुनी …….माझ्यापुढे ही टोपली
कुठले असावे फळ विषारी माहिती नाही मला
सोडून बसलो वाहत्या पाण्यात माझी नाव मी
लागेल ती कुठल्या किनारी माहिती नाही मला
वाढून सारी व्यंजने……मी आवडीने घेतली
येतेय का आता शिसारी माहिती नाही मला
मागेपुढे माझ्या सतत असतात काही सावल्या
जातात कोठे भरदुपारी….. माहिती नाही मला
बंदूक होती धूर्त पण …खांदा निरागस वाटला
तिसराच होता का शिकारी माहिती नाही मला
पाने, फुले, फांद्या, फळे, मी सर्वकाही छाटले
रोखू कशी नस वाहणारी माहिती नाही मला
डॉ. शिवाजी काळे.