मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि चांदा ते बांदा बाबत केलं भाष्य…
संपादकीय……
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात दीपक केसरकर एक करिष्मा असल्यासारखे पुढे आले. आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आमदार, मंत्री, पालकमंत्री झाले. जिल्ह्यात कधीही आला नव्हता एवढा विकासनिधी त्यांनी आणला परंतु विकासाशी देणंघेणं नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि केसरकर यांच्या नरमाई वागणुकीमुळे जिल्ह्यातील अधिकारी बेफिकीर राहिले परिणामी विकास खुंटला आणि केसरकर यांच्या सारख्या हुशार नेत्यालाही लोकांनी नावं ठेवलीच.
सावंतवाडीत केसरकरांनी मंजूर करून आणलेलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केसरकरांचे मंत्रिपद जाताच जागेचा प्रश्न उभा करत जिल्हाभर सैर करायला गेले. परंतु पुन्हा एकदा दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीत नियोजित जागेत होणार असे झूम अँप द्वारे पत्रकार परिषद घेत सांगितले, आणि वायफळ सुरू झालेल्या चर्चेस पूर्णविराम दिला.
केसरकर यांनी मंत्रिपदाचा काळात आणलेली चांदा ते बांदा योजना आघाडी सरकारने बंद करून सिंधुरत्न ही नवी योजना सुरू केली. परंतु केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत जुनी चांदा ते बांदा योजनेला २ वर्षांची मुदतवाढ मिळविली व त्या योजनेतील सुरू असलेली कामे पूर्ण करूनच सिंधुरत्न योजना सुरू करण्याची विनंती केली. त्यामुळे चांदा ते बांदा व अन्य योजनांचा १५० ते २०० कोटींचा निधी परत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले तसेच चांदा ते बांदाला दोन वर्षे मुदतवाढ दिली आहे. कोरोना आटोक्यात आल्यानंतर सदर कामे त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
आडाळी येथील फळ संशोधन केंद्र, तिलारी वन्य प्राणी केंद्र, शिवरामराजे भोसले मराठा वसतिगृह, मच्छीन्द्र कांबळी नाट्यगृह आदी सुरू करण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा मुख्यालयापैकी १०कोटी व बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी २०% रक्कम त्वरित देण्याची मागणी देखील केली आहे. चौकुळ कबूलायतदार बागायत प्रश्न सोडविण्याबाबत, मच्छीमारांसाठी गस्ती नौका पुरविणे जेणेकरून पराजिल्ह्यातील मच्छीमारांकडून मासळीची लूट होणार नाही या मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत, जिल्ह्यातील महामार्गाला जोडणारे दोडामार्ग बांदा, कसाल मालवण, देवगड, कणकवली असे रस्ते लवकरात लवकर व्हावेत यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले व तसे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले. जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी मागणी असून त्यांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात २१ एकर जागा उपलब्ध करून ठेवली आहे, आरोग्य आणि शैक्षणिक धोरण शैक्षणिक उपक्रम नुसार समन्वय साधून लवकरच मान्यता मिळावी म्हणून देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचे तसेच आपण देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून समन्वयाची भूमिका घेतल्याचे केसरकर म्हणाले.
गेले सहा महिने आरोग्याच्या कारणांनी जिल्ह्यात न आलेले आमदार केसरकर पुन्हा एकदा सक्रिय होत वैभव नाईक यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील अनेक कामे, समस्या इत्यादींकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले व जिल्ह्यातील डॉक्टरांची रिक्तपदे भरण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोंकण विभाग क्रमांक १ वर घ्यावेत अशी मागणी केली. केसरकर पुन्हा सक्रिय झाल्यामुळे त्यांच्याबद्दल राजकीय नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वावड्या बंद होऊन जिल्हा विकासात नक्कीच ते योगदान देतील आणि रखडलेली कामे पूर्णत्वास नेतील अशी आशा निर्माण झाली आहे. केसरकरांची नवी इनिंग सुरू झाल्याने सावंतवाडीकरांनी निश्वास टाकला आहे.